Articles

गुंतवणूक सुरु करण्यापुर्वी

गुंतवणूक !! म्हणजे काय?

प्रथमत: गुंतवणूक करणे हे किती शहाणपणाचे आहे हे तुम्हाला सांगणयाची गरज नाही कारण यात तुम्हाला अभिरुची असल्यामुळेच तुम्ही या माझ्या संकेतस्थळावर/ब्लॉगवर आला आहात. तुमचे येथे मन:पुर्वक स्वागत व तुमच्या योग्य निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन. मी तुम्हाला खात्रीने सांगतो कि गुंतवणूक विषयक सारी माहिती, ज्ञान व गुंतवणूकीचे शास्त्र व गुंतवणूकीची कला मी तुम्हाला येथे समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. ज्ञान हिच मुळी एक ताकद आहे. पैसा हा हुषारीनेच गुंतवला पाहिजे तरच गुंतवणूकीची ताकद समजू शकते. तुम्ही जर गुंतवणूकीबाबत अनभिज्ञ असाल तर, शेअर्स, बॉंण्डस्, बदला, उंधा बदला, परतावा, पी/इ रेशो हे शब्द म्हणजे तुम्हाला एखाद्या परभाषेतीलच वाटू शकतात. रिलँक्स. गुंतवणूकीची कला जर एखाद्याला खरोखर आत्मसात करावयाची असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ हा द्यावाच लागेल कारण हि गोष्ट शिकण्यासाठी काही वर्षेसुध्दा लागु शकतात. सुरुवात करण्यापुर्वी व गुंतवणूकीबाबत निर्णय घेण्यासाठी तुम्हाला अनेक बाबींची व पर्यायांची माहिती जमा करणे अत्यावश्यक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि याबाबत तुम्ही परिपुर्ण केव्हाच होऊ शकत नाही. सतत शिकत रहाणे, अनुभव घेणे हा गुंतवणूकीची कला शिकण्याचा एक भागच आहे. सुरुवात करण्यासाठी स्वत: उत्सुक असणे हि पहिली पायरी आहे. आवश्यक तेवढा वेळ व थोडी शिस्त पाळली तरच तुम्ही बाजारात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी लायक बनू शकता. तुम्ही केलेली बचत तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार व वयानुसार विविध साधनात गुंतवून आदर्श पोर्टफोलीओ तयार केला तर त्यापासून आकर्षक परतावा मिळू शकतो तसेच एखाद्यावेळी होणा-या मोठ्या नुकसानीपासून कसा बचाव करावयाचा हे ही ठरवता येईल, मात्र यासाठी आवश्यकता असते ती स्वयंशिस्तीची व संयमाची. गुंतवणूक म्हणजे काही तुमचे सारे पैसे भविष्यातील “एखाद्या इन्फोसीस” मध्ये टाकण्यासाठी वाट पहात रहाणे नव्हे. गुंतवणूक म्हणजे जुगार किंवा सट्टेबाजी नसून मर्यादित प्रमाणात जोखीम स्विकारुन नियमीत व स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत तयार करणे हेच गुंतवणूकीचे प्रमुख उदिष्ठ असावयास हवे. गुंतवणूक म्हणजे एखादी मालमत्ता खरेदी करुन त्यापासून किती उत्पन्न मिळू शकेल (लाभांश, व्याज, भाडे इ. स्वरुपात) तसेच दिर्घ मुदतीत त्या मालमत्तेत मुल्यवृध्दी किती होईल याचा योग्य अंदाज बांधणे हिच गुंतवणूकीची कला आहे.

तुम्ही गुंतवणूक का केली पाहिजे?

सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे कि ज्यामुळे तुमचे पैसे वाढतील व भविष्यात वाढणा-या महागाईचा सामना करणे तुम्हाला सहज शक्य होईल. तुमच्या गुंतवणूकीवर मिळणारा परतावा हा नेहमीच महागाईच्या दरापेक्षा जास्त असला पाहिजे, ज्यामुळे काही काळानंतर तुमच्याकडे एक चांगला फंड तयार होईल. तुम्ही तुमच्या पैशाची गुंतवणूक शेअर्स, बॉण्डस्, म्युच्युअल फंड किंवा मुदत ठेवी या पैकी कोणत्याही साधनात केली तरी त्याचे अंतीम उदिष्ठ हे निवृत्तीनंतरच्या आर्थीक गरजांची पुर्तता करणे, लग्न, कॉलेज फि, प्रवास, जास्त चांगले जीवनमान किंवा अगदी तुमच्या वारसांसाठी पैसे मागे ठेवणे या पैकी कोणत्याही कारणासाठी संपत्ती निर्माण करणे हे असू शकते नव्हे तर ते तसे असलेच पाहिजे. काही काळाने जेव्हा तुमच्या गुंतवणूकीत होणारी वाढ हि तुमच्या वाढणा-या पगारापेक्षा कितीतरी जास्त झाल्याचे तुम्हाला दिसेल तेव्हा होणारा आनंद हा काही औरच असेल.

गुंतवणूक केव्हा करावी?

जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेव्हढे चांगले. तुम्ही बाजारात लवकर गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या पैशाची चांगली वाढ होण्यासाठी जास्त वेळ देऊ शकता. तसेच असे केल्याने तुम्हाला चक्रवाढीने मिळणा-या व्याजाचा फायदा मिळून तुमचे लाभांशाचे उत्पन्न वाढण्यासही मदत होते. बाजारातील अनिश्र्चितता गृहित धरली तरी याबाबतचे झालेले संशोधन व इतिहास पहाता जर गुंतवणूकीचे तीन महत्वाचे नियम सांगावयाचे झाल्यास ते असे सांगता येतील कि (१) गुंतवणूकीची सुरुवात लवकर करा (२) नियमीत गुंतवणूक करत रहा (३) गुंतवणूक नेहमी दिर्घ काळासाठीच करा व ती अल्प मुदतीसाठी असू नये. गुंतवणूकीसाठी “उत्तम काळाची” वाट पहाण्याचा मोह होऊ शकतो तो टाळलाच पाहिजे कारण यामुळे होणा-या संभाव्य फायद्याची संधी हातातून जाण्याचा धोकाच जास्त असतो. गुंतवणूकीतून मिळणारा फायदा परत त्याच गुंतवणूकसाधनात गुंतवून चक्रवाढीचा जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो मात्र यासाठी आपल्या निवडलेल्या गुंतवणूक साधनावर आपला ठाम विश्वास असणे आवश्यक असते. चक्रवाढीचा परिणाम हा असतो कि तुम्ही फक्त तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवरच फायदा मिळवत नसून तो पुन:र्गुंतवणूक केल्यामुळे लाभांश/व्याजावरही वर्षानुवर्षे नियमीत मिळत रहातो. आणि म्हणूनच लाभांश/व्याजाची पुन:र्गुंतवणूक हि सुध्दा गुंतवणूकीची एक कलाच आहे. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करता व ती तशीच नियमीतपणे करत रहाण्याची सवय अंगी बाणवून तुम्ही जास्त पैसे मिळवू शकता. जेवढा जास्त काळ व जास्त व्याजदराने तुम्ही तुमच्या गुंतवणूकीच्या रक्कमेला वाढण्यासाठी देता तेवढा जास्त फायदा तुम्हाला मिळतो. म्हणूनच यासाठी शेअर्समधील गुंतवणूक हि दिर्घकालासाठी सर्वोत्तम मानली जाते. अर्थव्यवस्थेतील उंचावणारा आलेख हा शेअरबाजारातील चढ-उतारावर व नुकसान होण्याच्या जोखीमीवर मात करुन अतिशय उत्तम परतावा दिर्घ मुदतीत मिळवून देतो हे लक्षात ठेवा. म्हणून अल्पमुदतीत होणा-या नफा नुकसानीचा विचार न करता बाजारातील कोणतीही गुंतवणूक हि दिर्घ काळासाठी करावयाची असते हे पक्के लक्षात ठेवा. गुंतवणूक करण्यासाठी माझ्याकडे किती पैसे असावयास हवेत? याला कोणतेही बंधन नाही. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढ्याने तुम्ही सुरुवात तर करा. तुम्ही गुंतवणूक करणार असणा-या रकमेवर व गुंतवणूकीच्या साधनावर खालील बाबींचा प्रभाव मात्र पडू शकतो: १) तुमची जोखीम स्विकारण्याची तयारी. २) किती काळासाठी तुम्ही गुंतवणूक करणार आहात. ३) तुम्ही केलेल्या बचतीची रक्कम किती उपलब्ध आहे. वरील तिन्ही बाबींचा विचार आपण पुढील काही प्रकरणातून करणार आहोत. तुम्ही कोण-कोणत्या साधनात गुंतवणूक करु शकता? तसे पहाता गुंतवणूकीसाठी अनेक साधने आहेत, त्यापैकी काही: १) कंपन्यांचे शेअर्स २) कर्जरोखे (बॉण्डस्) ३) म्युच्युअल फंडाच्या विविध योजना ४) मुदत ठेवी ५) जमिन – जुमला ६) सोने ७) अन्य

लेखक – सदानंद

अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय

व्यक्तीगत अर्थव्यवस्थापन – काय काळजी घ्यावी?

प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना ती गोष्ट ती गोष्ट नवीनच असते हेच सुत्र गुंतवणूकीलाही लागू पडते. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे अतीरिक्त रक्कम असणे आवश्यक आहे. कर्ज काढून कधीही गुंतवणूक करु नये. तुम्हाला जर दर महिना तुमच्या उत्पन्नापैकी काही रक्कम बचत करण्याची सवय नसेल तर तुम्ही गुंतवणूक करु शकत नाही, म्हणून माझा सल्ला आहे कि: १) अचानक उद्भवणा-या गरजेसाठी प्रथमत: तुम्ही तुमच्या ४ ते ५ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम तुमच्या बँकेच्या बचत खात्यात शिल्लक ठेवली पाहिजे. यालाच इमर्जन्सी फंड असेही म्हणतात. या रकमेचा उपयोग कोणत्याही गुंतवणूक साधनात करु नका. हे पैसे केव्हाही उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध असले पाहिजेत, म्हणूनच ते मुदत ठेवीत, शेअर्स अथवा कोणत्याही दिर्घ मुदतीच्या साधनात गुंतवू नका. ज्या बचत खात्याचे एटिएम कार्ड तुमच्याकडे असेल अशाच खात्यात हि रक्कम ठेवा. अगदी इमर्जन्सीच्या वेळीच या रकमेचा उपयोग करा. अशी रक्कम ठेवण्याचा उद्देश एखाद्या आजारपणात होऊ शकतो, अपघात झाल्यास होऊ शकतो किंवा काही कारणाने नियमीत उत्पन्नाचे साधन काही काळ बंद झाल्यास होऊ शकतो. २) तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३० ते ३५ टक्के रक्कम नियमीतपणे बचत करण्याची सवय लाऊन घ्या व हा नियम काटेकोरपणे पालन करा. तसेच बचतीचे प्रमाण वाढवण्याची सवय स्वत:ला लावा. जसे उत्पन्न वाढत जाईल तशी बचतही वाढवत न्या. अचानक बोनस किंवा अन्य मार्गाने पैसे मिळाल्यास त्यातील बहुतांश रकमेची बचत करा. काटकसरीची सवय लावणे यासाठी उपयुक्त होते. ३) अनावश्यक खर्च टाळा. ऐश करण्याची प्रवृत्ती न ठेवणे भविष्यात फायदेशिर होते. महागड्या हॉटेलात जाणे टाळा. अशाप्रकारे पैसे वाचवून ते गुंतवणूकीसाठी वापरण्याची सवय लावा. ४) तुमच्या विवाहाच्या वर्षदिनी, तुमच्या वाढदिवशी तसेच घरातील अन्य व्यक्तींचे वाढ दिवशी तुम्ही काही शेअर्स विकत घ्या हि तुमची सर्वोत्तम स्वत:ला दिलेली भेट भविष्यात ठरणार आहे. ५) एखाद्या खर्चीक प्रवासाला किंवा सहलीवर उगाचच पैसे उडवण्याऐवजी त्या पैशांचे चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या. ६) तुम्ही अशाप्रकारे केलेल्या बचतीतून जास्त व्याज मोजावे लागणारी काही कर्जे, क्रेडिट कार्डचे देणे वगैरे प्रथमत: फेडून टाका कारण अशा प्रकारच्या कर्जावर २४ ते ३६% व्याज आकारले जाते. मी शेअर बाजारात गुंतवणूक करुन त्यातून भरपूर फायदा मिळवीन व अशी कर्जे फेडिन असे म्हणणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. तेव्हा तुमच्याकडे असणारी कितीही छोटी किंवा मोठी रक्कम प्रथमत: तुमचे अतिरिक्त व जास्त व्याजाचे कर्ज फेडण्यासाठीच वापरा. ७) निवृत्तीनंतर जे पैसे मिळणार असतात जसे कि पीएफ वगैरे त्या पैशाना अजिबात हात लावू नका, असे करणे म्हणजे म्हातारपण कष्टात जाणार हे लक्षात ठेवा. हे पैसे काढले तर तुमचा मालक जे तुमच्या बचतीएवढी रक्कम त्यात टाकत असल्यामुळे जी दिर्घ मुदतीत चांगला फायदा होण्याची संधी असते ती तुम्ही गमावून बसता. तसेच हि रक्कम जर तुम्हाला वाढीव पगार म्हणून देण्याची ऑफर आली तर ती कधीच स्विकारु नका. गुंतवणूकीचे विविध पर्याय व त्यापासून मिळणारा सरासरी परतावा. तुमच्यासमोर गुंतवणूकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, त्यापैकी योग्य तोच पर्याय तुम्ही तुमची जोखीम स्विकारण्याची मानसीक तयारी, गुंतवणूकीसाठी किती काळ देणे शक्य आहे वगैरे गोष्टी विचारात घेऊनच गुंतवणूकीचा पर्याय निवडला पाहिजे. जर शेअर बाजारातील चढ उतार तुम्ही पचवू शकता असे वाटत असेल तर शेअर्स खरेदी करा. जर तुम्ही बाजाराच्या चढ उताराला घाबरत असाल व जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीवर निश्र्चित नियमीत दराने उत्पन्न हवे असेल तर निश्र्चित उत्पन्न देणा-या साधनातच गुंतवणूक केलेली चांगले असते. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि उत्पन्न व जोखीम हे हातात हात घालूनच चालत असतात म्हणजे ज्या गुंतवणूकीत जास्त जोखीम असते तेथे उत्पन्न सुध्दा जास्त मिळण्याची शक्यता असते. आता काही उपलब्ध पर्याय पाहुया: १) शेअर्स – एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेणे म्हणजेच त्या कंपनीची त्या प्रमाणात भागिदारी स्विकारण्यासारखेच असते. शेअर्स हे एक्सचेंज मार्फत तुमच्या डिमँट खात्याचा वापर करुन विकत घेता येतात किंवा जेव्हा ती कंपनी प्रथमच भांडवली बाजारात उतरते तेव्हा आयपीओ मधूनही विकत घेता येतात. जर तुम्ही दिर्घ काळासाठी (१५/२० वर्षांसाठी) गुंतवणूकीचा विचार करत असाल तर शेअर्स खरेदी करणे अतिशय फायदेशिर होते. अशा गुंतवणूकीत बाजाराच्या चढ उताराची जोखीम असते मात्र दिर्घ मुदतीत, एकूणच अर्थव्यवस्थेत होणा-या नियमीत वाढीमध्ये हि जोखीम सामावून घेण्याची ताकद असते. अशाप्रकारे केलेल्या गुंतवणूकीतून दोन प्रकारचे लाभ मिळतात – अ) लाभांश – कंपनीला होणा-या निव्वळ नफ्यापैकी काही रक्कम भागधारकाना लाभांश स्वरुपात वाटली जाते. मिळणारा लाभांश

लेखक – सदानंद

शेअर बाजाराची प्राथमिक माहिती

शेअर बाजाराचे कामकाज

शेअर बाजारातून पैसे कसे मिळवता येऊ शकतात हे जर का तुम्हाला समजून घ्यावयाचे असेल तर तुम्हाला शेअर बाजाराचे कामकाज कशा प्रकारे चालते हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यक्तीला शेअर्सची खरेदी किंवा विक्री बाजारात करावयाची असेल तर त्याला प्रथमत: ब्रोकरकडे ऑर्डर नोंदवणे गरजेचे असते. जेव्हा अशाप्रकारे शेअर्सच्या खरेदीची ऑर्डर ब्रोकरकडे नोंदवली जाते तेव्हा ब्रोकर त्याच्या सिस्टीमव्दारे ती एक्सचेंजकडे पाठवण्याचे काम करतो. त्यानंतर ती एक्सचेंजच्या सिस्टीममध्ये रांगेत (क्यू) उभी रहाते व त्यानंतर ती सिस्टीममध्ये लॉग झाल्यानंतर तिची सिस्टीममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणा-या शेअर्समधून खरेदीच्या व्यवहाराची पुर्तता केली जाते. अशाप्रकारे व्यवहार झाल्यानंतर ते शेअर्स ब्रोकरच्या मार्फत खरेदीदाराच्या डिमँट खात्यात वर्ग (जमा) केले जातात (किंवा पेपर रुपात खरेदीदाराला प्रत्यक्ष दिले जातात).

भारतीय शेअर बाजार – एक धावती नजर

मुंबई (बॉंम्बे) स्टॉक एक्सचेंज (बीएसई) व नँशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हि दोन प्राथमीक एक्सचेंजेस् भारतात अस्तित्वात आहेत. या व्यतरिक्त २२ प्रादेशीक स्टॉक एक्सचेंजेस् कार्यरत आहेत. परंतु बीएसई व एनएसी हिच महत्वाची दोन एक्सचेंजेस् असून भारतातील ८०% व्यवहार हे या दोन एक्सचेंजेस् च्या माध्यमातून दर दिवशी केले जातात. दोन्ही एक्सचेंजेस् वर जवळपास सारख्यास संख्येत रोजच्या व्यवहारांची उलाढाल होत असते. सन १९९७-९८ मध्ये रोजची सरासरी उलाढाल रु.८५१ कोटी होती, ती २०११-१२ सालात रु.२३००० कोटी एवढी वाढली आहे. एनएसी मध्ये 2120 कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.५४.१७ लाख कोटी एवढे आहे. बीएसई मध्ये ५१३३ पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.५९.७० लाख कोटी एवढे आहे. बहुतांशी प्रमुख कंपन्याचे शेअर्स हे दोन्ही स्टॉक एक्सचेंजीस् वर नोंदवलेले असल्यामुळे त्यांचे व्यवहार दोन्ही ठिकाणी केले जात असतात त्यामुळे गुंतवणूकदार दोन्ही पैकी कोणत्याही एका ठिकाणी त्याचे व्यवहार करु शकतो. दोन्ही एक्सचेंजीसची व्यवहार पुर्ततेचा कालावधी थोडा वेगवेगळा असल्यामुळे गुंतवणूकदार त्यांची पोझीशन शिफ्ट करु शकतो. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्राथमीक इंडेक्स बीएसई सेनेक्समध्ये ३० कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. तर एनएसई चा एस अँड पी एनएसई ५० इंडेक्स (निफ्टी) मध्ये पन्नास कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. बीएसई सेनेक्स हा एक जुना इंडेक्स असून तोच जास्तकरुन गुंतवणूकदारांमध्ये प्रचलीत आहे. दोन्ही कडील इंडेक्सचे अंश (indices) हे त्यामध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व कंपन्यांच्या मिळून एकत्रीत भांडवली मुल्यावर व रोजचे रोज प्रत्येक क्षणी गणले जातात. दर शनिवार व रविवारी शेअर बाजाराचे व्यवहार बंद असतात. दोन्हीकडे आता स्वयंचलीत पुर्णत: संगणकीकृत थेट (Online) व्यवहार केले जातात त्याला बोल्ट (BSE on Line Trading) आणि नीट (National Exchange Automated Trading) सिस्टीम म्हणून ओळखले जाते. यामुळे अत्यंत प्रभावीपणे व वेगाने सर्व व्यवहार केले जातात ज्यामध्ये स्वयंचलीतपणे ऑर्डर जुळवली जाणे, व्यवहारांची वेगवान पुर्तता केली तर जातेच परंतु महत्वाचे म्हणजे या सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाते. बीएसई वर ज्या शेअर्सचे व्यवहार केले जातात त्यांचे ‘A’, ‘B1’, ‘B2’ ‘C’ ‘F’ व ‘Z’ या विभागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. यातील ‘A’ या विभागात असे शेअर्स असतात कि जे बदला (Carry Forward) मध्ये समाविष्ठ असतात. ‘F’ विभागात कर्जरोखे बाजाराचे निश्र्चित उत्पन्न साधनांची नोंद केली जाते (Debt Market – Fixed Income Securities) व यांचे व्यवहार केले जातात. ‘Z’ या विभागात काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्याचे शेअर्स असतात. ‘C’ विभागात ‘A’, ‘B1’, ‘B2’ मधील ज्या सिक्युरिटीजचे ऑड लॉट मध्ये व्यवहार केले जातात अशा सिक्युरिटीजची नोंद केलेली असते. सर्व स्टॉक एक्सचे्जीस्, ब्रोकर (दलाल), डिपॉझीटरीज, डिपॉझीटरी पार्टीसीपन्टस्, म्युच्युअल फंडस्, परदेशी अर्थसंस्था आणि अन्य सर्व सहभागीदार जे भारतातील प्राथमीक व दुय्यम भांडवली बाजारात सहभागी होतात त्या सर्वांवर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियंत्रक संस्थेचे नियंत्रण असते.

रोलींग सिस्टीम सायकल

रोलींग सिस्टीममध्ये, व्यवहाराचा प्रत्येक दिवस हा व्यवहाराचा काळ समजला जातो आणि अशा दिवसात केलेले सर्व व्यवहार हे त्या दिवसाचे निव्वळ देयक (Net obligation) समजून त्या व्यवहारांची पुर्तता केली जाते. एनएसई व बीएसई वर रोलींग सिस्टीममध्ये व्यवहार टी+२ या सुत्रानुसार म्हणजेच व्यवहाराच्या दुस-या दिवशी पुरे केले जातात. पुर्तता दिवस निश्र्चित करण्यासाठी सर्व शनिवार, रविवार, सुट्ट्यांचे दिवस ज्यामध्ये बँक हॉलीडेज, एक्सचेंज हॉलीडेज इ. वगळले जातात. उदा. मंगळवारच्या व्यवहारांची पुर्तता बुधवारी व शुक्रवारच्या व्यवहारांची पुर्तता सोमवारी केली जाते.

खरेदीची मर्यादा

समजा तुम्ही काही शेअर्स एनएसई वर विकले आहात आणि त्याचे पैसे जर तुम्हाला दुस-या सेटमेंट सायकलमध्ये वापरून परत एनएसई अथवा बीएसई वर शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरावयाचे असतील तर त्यासाठी तुमचा ब्रोकर तुम्हाला खरेदीची काही मर्यादा वापरण्यास देतो तिलाच खरेदीची मर्यादा म्हणतात. समजा तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे रु.५००००/- तुमच्या बँक खात्याव्दारा जमा केले आहात तर ब्रोकर तुम्हाला तेवढ्याच रकमेच्या किंमतीएवढे शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देईल. आता समजा सोमवारी तुम्ही रु.१,००,०००/- किंमतीचे शेअर्स विकलेत तर त्या क्षणापासून तुम्ही रु.१,५०,०००/- पर्यंतचे शेअर्स एनएसई किंवा बीएसई वर खरेदी करु शकता. आता मंगळवारी तुम्ही रु.७५,०००/- चे शेअर्स खरेदी केलेत तर शिल्लक मर्यादा राहील रु.७५,००००/- ची. म्हणजेच थोडक्यात खरेदी मर्यादा म्हणजे तुम्ही ब्रोकरकडे जमा केलेली रक्कम अधीक तुम्ही विकलेल्या शेअर्सची किंमत.

डिमटेरिअलाझेशन म्हणजे काय?

डिमटेरिअलाझेशन म्हणजेच डिमँट ज्यामध्ये गुंतवणूकदार त्याच्याकडे असणारे प्रत्यक्ष सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स, डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे इलेक्टॉनीक स्वरुपात ठेवल्या जाणा-या प्रणालीत बदली करुन घेऊ शकतो. गुंतवणूकदार त्याच्या नांवावर असणा-या सिक्युरिटीज सर्टिफिकेट ज्या डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे डिमटेरिअलाझेशन साठी पुर्वी नोंदवलेल्या असतात त्याच फक्त डिमँट करु शकतो.

डिपॉझीटरी

अशी एक संस्था जी गुंतवणूकदारांच्या सिक्युरिटीज इलेक्टॉनीक स्वरुपात सांभाळून ठेवीत असते तिला डिपॉझीटरी म्हणून संबोधीले जाते. म्हणूनच हिला सिक्युरिटीज बँक असेही म्हणता येईल. भारतात एनएसडिएल व सिडीएसएल अशा दोन संस्था हे काम करतात. डिपॉझीटरी प्रणाली हि बँकेप्रमाणेच काम करते फरक एवढाच असतो बँक तुमच्या पैसे हाताळते तर डिपॉझीटरीज् तुमच्या शेअर्स व अन्य भांडवली सिक्युरिटीज हाताळत असते. जो गुंतवणूकदार या संस्थाच्या सेवेचा वापर करुन घेऊ इच्छितो त्याला या संस्थेकडे एक खाते डिपॉझीटरी पार्टीसिपंटचे मार्फत उघडावे लागते, हेच डिमँट खाते.

डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)

भांडवली बाजारातील मध्यस्त ज्याच्यामार्फत गुंतवणूकदाराला डिपॉझीटरी सर्व्हिसेस घेता येतात त्याला डिपॉझीटरी पार्टीसीपंट म्हणतात. सेबीच्या नियमानुसार डिपी म्हणजे अशी संस्था जी आर्थीक सेवा देते उदा. बँक, ब्रोकर्स, कस्टोडिअनस्, इ. या डिपींच्या वितरण व्यवस्थापनाच्या माध्यमातून डिपॉझीटरीला संपुर्ण देशभर विखुरलेल्या गुंतवणूकदारांपर्यत कमी खर्चात पोहोचण्याची सुवीधा मिळते. डिपीची नियुक्ती हि अनेक बाबींची पुर्तता व सेबीच्या मान्यतेनंतर डिपॉझीटरी करत असते. यासाठी कठोर नियमाली असते. या व्यवसायाची व्याप्ती विचारात घेऊनच अनेक बँका, आर्थीक संस्था, ब्रोकर्स हे डिपी म्हणून संपुर्ण देशभर काम करत आहेत.

डिपॉझीटरी प्रणालीचे फायदे

डिमँट मधून केलेल्या व्यवहारांमुळे होणारे फायदे: १) वाईट व्यवहाराना पुर्णत: पायबंद बसतो. २) शेअर ट्रान्सफरच्या वेळी 0.5% स्टँप ड्युटीची बचत. ३) कुरिअर/पोस्टेजचा खर्च नाही. ४) ड्युप्लीकेट सर्टिफिकेटसाठी ब्रोकरबरोबर पाठपुरावा करण्याची गरज नाही. ५) सर्टिफकेट हरवण्याचा धोका नाही. ६) तत्काळ ट्रान्सफर होत असल्यामुळे तरलता सुलभ. ७) कमी दलाली खर्च. ८) बोनस व राईट शेअर्स डिमँट खात्यात विनाविलंब जमा होतात. ९) डिमँट स्वरुपातील शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतल्यास कमी व्याज दराचा फायदा मिळतो. १०) जास्त कर्ज मिळते, किंमतीच्या ७५% पर्यंत विनासायास. डिमँट खाते कसे उघडावे बँकेत बचत खाते सुरु करण्याइतकेच डिमँट खाते उघडने सोपे व सुलभ आहे. तुम्ही कोणत्याही डिपी बरोबर खाते काढू शकता. १) तुमच्या आवडीच्या डिपीकडे असणारा फॉर्म भरा, फोटो चिकटवा, सह्या करा. २) डिपी बरोबरच्या करारपत्रावर, ते वाचून नंतर सह्या करा. ३) पँन कार्ड, रहाण्याचा पुरावा, बँक खाते पुरावा, फिचा चेक इ. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वसाक्षांकीत जोडा. ४) डिपीकडे वरीलप्रमाणे जमा करा. ५) डिपी तुम्हाला ग्राहक खाते क्रमांक व डिपी आयडी प्रदान करेल ज्याची नोंद डिपॉझीटरीकडे असेल. ६) तुम्ही कितीही डिमँट खाती उघडू शकता. ७) जर तुमच्याकडे सर्टि. स्वरुपात जॉईंट नांवाने शेअर्स असतील तर त्यावर ज्या क्रमाने नांवे असतील त्याच क्रमाने डिमँट खाते उघडणे श्रेयस्कर होते. तुमच्याकडील सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स डिमँट कसे करावेत? डिमटेरिअलायझेशनचा फॉर्म भरा. सोबत शेअर सर्टिफिकेटवर (Surrendered for Demat) असे लहून सोबत जोडा. १५ दिवसात तुमच्या खात्यात शेअर्स जमा होतील. याचप्रमाणे एका डिमँट मधील शेअर्स दुस-या डिमँट मध्ये वर्ग करता येतात. डिमँट खात्यातून व्यवहार करणे सेबीने ७६१ कंपन्याचे शेअर्सचा व्यवहार हा डिमँटमधूनच करणे बंधनकारक केलेले आहे.

शॉर्ट सेलींग

जर तुमच्या खात्यात शेअर्स नसतानाही जर तुम्ही शेअर्सची विक्री केली तर अशा व्यवहाराला शॉर्ट सेलींग असे म्हणतात. जेव्हा एखाद्या ट्रेडला वाटते एक विशिष्ठ शेअरची किंमत त्या दिवशी कमी होणार आहे तर तो असे करतो, मात्र अशा व्यवहाराची पुर्तता त्याच दिवशी बाजार बंद होण्यापुर्वी करावी लागते (काही डिपी ते स्वयंचलीत प्रणालीचा वापर करुन करतात तर काही करत नाहीत मात्र नंतर अश्या व्यवहारांचा लिलाव ते करतात व ज्यात १००% तुमचे प्रचंड नुकसान होते). मी स्वत: असे व्यवहार कधीच करत नाही व तुम्ही सुध्दा हे करण्यात फारच जोखीम असते हे लक्षात ठेवावे. हा एक डे ट्रेडिंगमधला व्यवहार असून यात ९५% पेक्षा जास्त लोकांचे नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या.

मार्जीन ट्रेडिंग

वस्तुत: शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्या डिमँट खात्यात पैसे शिल्लक हवेत व विक्री करण्यासाठी शेअर्स जमा हवेत. मात्र बहुतांशी ब्रोकर (डिपी) तुमच्या डिमँट खात्यात असणा-या शेअर्स अथवा रोख जमा रकमेच्या अगदी १० पटीपर्यंत किंमतीचे व्यवहार करण्याची मुभा देतात. उदा. तुमच्या खात्यात रु.एक लाख जमा आहेत तर ब्रोकर तुम्हाला १० लाख रु. किंमतीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याची मुभा देतो. समजा अ कंपनीच्या शेअरचा भाव रु.१०००० आहे तर रु.एक लाखात तुम्ही १० शेअर्स घेऊ शकता, मात्र ब्रोकर तुम्हाला ते १०० घेण्याची परवानगी देतो. जर नंतर भाव त्याच दिवशी रु.११००० झाला तर तुम्हाला एका दिवसात तुमच्या एक लाखावर एक लाख रु. फायदा होतो, तेच भाव ९००० झाला तर संपुर्ण एक लाख रुपये नुकसान होते. या सुविधेलाच मार्जीन ट्रेडिंग असे म्हणतात. मी हि सुवीधा कधीच वापरत नाही. यात फारच मोठा धोका असतो. ९५% पेंक्षा जास्त लोकांचे अशा व्यवहारात (एकूणच डे ट्रेडिंग मध्ये) नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या. अमेरिकन शेअर बाजारात ह्या प्रकाराला परवानगीच नाही.

ऑर्डरचे प्रकार

लिमीट ऑर्डर: एक दराची मर्यादा घालून प्लेस केलेली ऑर्डर. समजा रिलायन्सच्या शेअरची आस्क किंमत रु. ७१०, परंतु तुम्हाला तो रु.७०० ला घेणे योग्य वाटत असेल तर तुम्ही रु.७०० च्या दराने लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. जर त्या शेअरची किंमत .७०० किंवा त्यापेक्षा कमी झाली तरच तुमच्या ऑर्डरची पुर्तता होऊन शेअर्स तुमच्या खात्यात जमा होतील. समजा त्या दिवशी रिलाची किंमत रु.६९० झाली व त्यावेळी जर आस्क किंमत रु.६९४ असेल तर तुमच्या खात्यात ६९४ च्या दराने शेअर्स जमा होतील. याचप्रकारे तुम्ही विक्रीसाठीसुध्दा लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. उदा. तुमच्याकडे ६९४ ने खरेदी केलेला रिलायन्सचे शेअर्स आहेत व तुम्हाला वाटते जर रु.७१२ किंमत मिळाली तर तो विकावा, तर तुम्ही रु.७१२ च्या लिमीट ऑर्डर नोंदवा, दर ७१२ किंवा अधीक झाला तर व्यवहार पुर्तता होईल. यालाच लिमीट ऑर्डर म्हणतात. मार्केट ऑर्डर: त्या क्षणी असणा-या दराने दिलेली खरेदी-विक्रीची ऑर्डर. अशा वेळी ऑर्डर पुर्ततेच्या क्षणी असणा-या दराने ऑर्डरची पुर्तता केली जाते. मग ती कमी अथवा जास्तसुध्दा होऊ शकते. स्टॉप लॉस ऑर्डर: यालाच ट्रिगर प्राईज ऑर्डर असेही म्हणातात, याचा उपयोग संभाव्य नुकसान मर्यादित करण्यासाठी केला जातो. याचा वापर अत्यंत हुशारीने करावा.

सर्किट फिल्टर व ट्रेडिंग बँडस

बाजारातील चढ उतारावर (अस्थीरतेवर) मर्यादा असावी म्हणून सेबीने काही नियम केलेले आहेत व किंमतीनुसार दिवसातील कमाल व किमान दरातील फरक ठरविलेला आहे. त्यानुसार ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० ते रु.२० च्या दरम्याने आहे त्यांची किंमत दिवसात २५% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० पेक्षा आहे त्यांची किंमत दिवसात ५०% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.२० पेक्षा जास्त आहे त्यांची किंमत दिवसात ८% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. मात्र १०० निवडक शेअर्सचे बाबत ८% च्या नियम ८% व एक तासानंतर परत ८% असा शिथील केलेला आहे. या गणणेसाठी आदल्या दिवसाचा बंद भाव आधारभूत ठेवलेला आहे. एनएसई व बीएसई वरील बंद भाव वेगवेगळा असू शकतो म्हणून दोन्हीकडचे सर्किटही वेगळे असू शकते.

बदला

बदला म्हणजे कशाच्यातरी बदल्यात सौदे पुढे चालू ठेवणे (Carry Forward). बदला हि एक प्रकारची सौदे पुढे चालू ठेवण्यासाठी दिलेली फि (आकार) असते. हे एक हेजींगचे माध्यम आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार प्रत्यक्ष शेअर्सचा ताबा न घेता त्या शेअर्समध्ये आपला सहभाग (Position) चालू ठेवू शकतो. या साठी त्याला थोडी फि द्यावी लागते. हे झाले शेअर्सच्या खरेदीबाबत पण तेच जर का त्याला शेअर्सचे शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी द्याव्या लागणा-या फिला उंधा बदला असे म्हणतात. या बदला प्रकारामुळे ३ प्रकारच्या गरजा भागवल्या जातात: १) क्वसी हेजींग: जर गुंतवणूकदाराला वाटत असेल कि एखाद्या शेअरची किंमत पुढील काही काळात वाढणार/घटणार आहे, तर अशा वेळी शेअर्स प्रत्यक्षात न घेता/देता तो या व्यवहारात अस्थीर बाजारात सहभागी होऊ शकतो. २) शेअर गहाणवट (Stock Lending): जर त्याला प्रत्यक्ष विक्रीसाठी शेअर्स नसतानासुध्दा शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी काही आकार घेऊन हे करण्यास तयार असणारे शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला हि सुवीधा उपलब्ध करुन देतात. ३) कर्ज व्यवहार (Financing Mechanism) : जर त्याला शेअर्सची पुर्ण किंमत दिल्याशिवाय ते खरेदी करावयाचे असतील तर शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला यासाठी पैसे काही आकार (व्याज) घेऊन पुरवतात. या व्यवहाराला “व्याज बदला” किंवा “बदला” म्हणतात. हा व्यवहार समजून घेण्यासाठी आपण एक उदाहण पाहूया. क्ष या व्यक्तीने इंफोसीसचे १००० शेअर्स खरेदी केलेले आहेत मात्र त्याचा ताबा घेण्यासाठी त्याला त्याची पुर्ण किंमत देणे आवश्यक आहे परंतु क्ष कडे तेवढे पैसे खात्यात शिल्लक नाहित, अशावेळी तो शेअर बाजारात उपलब्ध असलेल्या “बदला” व्यवस्थेची सुवीधा वापरु शकतो. आता काय होते कि जी व्यक्ती क्ष ला बदला व्यवस्थेतून हा खरेदीचा व्यवहार पुर्ण करण्यासाठी पैसे देण्यास तयार असते ती व्यक्ती क्षच्या वतीने ते शेअर्स खरेदी करते आणि क्ष ला त्याने कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर फक्त व्याज द्यावे लागते. याच्या उलट जर का क्ष कडे शेअर नसतानासुध्दा त्याने विक्री केलेली असेल तर त्याच्याकडे दुस-याला डिलेव्हरी देण्यासाठी शेअर्स नसतात म्हणून स्टॉक एक्सचेंज मार्फत तो ज्याच्याकडे शेअर्स असतात अश्या व्यक्तीकडून ते उधार घेतो व त्यासाठी त्याला व्याज (बदला) द्यावा लागतो. गुंतवणूकदार म्हणून तुम्ही बदला सेवा घेऊ किंवा देऊ शकता. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हि सेवा व्याज भरुन घेता व जर तुमच्य़ाकडे पैसे किंवा शेअर्स असतील तर व्याज (बदला) घेऊन हे सेवा तुम्ही स्टॉक एक्सचेंज मार्फत दुस-याला देऊ शकता. दर शनिवारी बीएसई मध्ये बदला व्यवस्थेसाठी एक सत्र चालते ज्यात या व्यवहारात ज्या शेअर्स/सिक्युरिटिजचे पोटी उधार व्यवहार असतात त्यांची यादी तयार केली जाते. बाजारात उपलब्ध असणा-या रोखतेवर व्याजाचे (बदल्याचे) दर ठरतात. जेव्हा बाजारात जास्त खरेदी होते तेव्हा बदला दर जास्त असतो व जेव्हा बाजारात विक्री जास्त होते तेव्हा बदला दर कमी असतो. बदला व्यवहारांसाठी फक्त ‘A’ विभागातील शेअर्स, ज्यांचा डिव्हीडंड जास्त व नियमीत मिळण्याचा पुर्वेतिहास आहे, ज्याना उच्च तरलता (Liquidity) असते, ज्यांची रोजच मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असेच ए गृपमधील शेअर्स विचारात घेतले जातात. गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळावा म्हणुन या व्यवहारांसाठी कोणते शेअर्स ग्राह्य धरले जातील हे अगोदर जाहिर केले जात नाही. या प्रकारातील सौदे पुर्ण केले जाण्याची खात्री असते व त्यासाठी ट्रेड गँरण्टी फंड ऑफ बीएसई हा निर्माण केलेला आहे, त्यामुळे अशा व्यवहारात सौदा पुर्तीची जवळपास जोखीम नसते, फक्त जर का तुमचा ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरच जोखीम येऊ शकते ज्याची शक्यता जवळपास नसते. आणि जरी ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरी शेअर्स तुमच्याच मालकीचे असतात ते तुम्ही केव्हाही विकू शकता, फक्त बाजाराच्या अस्थिरतेची अशा वेळी जोखीम राहिल.

सिक्युरिटी लेंडिंग

हि व्यवस्था एनएसईची असून हि बीएसईच्या बदल्याप्रमाणेच काम करते फक्त यात सौदे पुढे चालू ठेवण्याची मुभा नसते.

इनसायडर ट्रेडिंग

भारतात इनसायडर ट्रेडिंगवर बंदी आहे. जी माहिती संवेदनशील आहे व ज्यामुळे शेअरच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो व ती माहिती, माहितीच्या नियमीत स्त्रोतापेक्षा अन्य ठिकाणापेक्षा (कंपनीच्या अंतर्गत) मिळवून स्वत:च्या फायद्यासाठी कंपनीच्या पदाधीका-यानी वापरुन त्या माहितीचा उपयोग करुन शेअर ट्रेडिंग करणे याला बंदी आहे. या बाबत सेबीचे कायदे अत्यंत कडक आहेत. या बाबत अधीक माहिती सेबीच्या http://www.sebi.gov.in/ साईटवर आहे.

लेखक – सदानंद

तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा

गुंतवणूकीचे उदिष्ठ

दिर्घ मुदतीत गुंतवणूकीपासून चांगला परतवा मिळेल अशा गुंतवणूकीच्या साधनाची निवड अत्यंत काळजीपुर्वक केली पाहिजे. अल्प काळाचा विचार गुंतवणूक करताना करणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. मुख्यत्वेकरुन जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही दिर्घ काळाचाच विचार करणे तुमच्या हिताचे होईल. शेअर बाजारात नेहमीच शेअर्सच्या किंमती अत्यंत वेगाने वर खाली होत असतात. सुरुवात करताना किमान ३ ते ५ वर्षाचे उदिष्ठ ठेऊन गुंतवणूकीची सुरुवात करा. त्यासाठी प्रथमत: तुम्ही स्वत:लाच ओळखण्यास सुरुवात करा. तुम्ही तुमच्या गुंतवणूकीपासून काय मिळवू इच्छित आहात? नियमीत उत्पन्न, मुद्दलात वाढ कि दोन्ही गोष्टी मिळवू इच्छीत आहात हे ठरवा. आता तुम्ही जोखीम स्विकारण्यासाठी किती तयार आहात? प्रत्येकाची जोखीम स्विकारण्याची मानसीकता सारखी असू शकत नाही त्यामुळे बाजारात गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झाले तर लगेच शेअर्स नुकसानीत विकून बाजारापासून दुर जाण्याची प्रवृत्ती असेल तर त्यात अनैसर्गीक असे काहीच नाही. कोणत्याही व्यवसायात नफा व नुकसान हे असतेच. जेथे जास्त फायदा मिळण्याची शक्यता असते तेथे नुकसानही जास्तच होऊ शकते. शेअर बाजाराचा दोनशे वर्षाचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते कि अनेकवेळा शेअर बाजार ६०% पेक्षा जास्त कोसळलेला आहे हि जशी वस्तुस्थीती आहे त्याचप्रमाणे ज्यानी ज्यानी चांगल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक केली आहे त्या सर्वानाच अतिशय उत्तम फायदा झालेला आहे. म्हणूनच शेअर बाजारात तुम्हाला उतरावयाचे असेल तर तुम्ही दिर्घकाळासाठीच गुंतवणूक करणे व ती नियमीतपणे करणे हेच अंतीमत: योग्य ठरु शकते. तुम्हाला माहित असेलच कि बेंजामीन ग्राहम व वॉरेन बफेट सारख्या यशस्वी गुंतवणूकदारानी शेअर बाजारातून अमाप उत्पन्न मिळवले पण त्यानी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये बदल झाला तरच त्यांची त्या कंपनीतील गुंतवणूक काढून त्यांच्या पोर्टफोलीओमध्ये बदल केलेला आहे. जर का तुम्हाला एकदा हे समजले कि आपल्याला आपल्या गुंतवणूकीपासून किती फायदा होऊ शकतो तरच काही तासात, दिवसात, आठवड्यात, माहिन्यात किंवा अगदी २ ते ३ वर्षातसुध्दा तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत कमी अथवा जास्त झाली तरी तुम्ही विचलीत होणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरुवात करताना म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेपासून सुरुवात करणे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुम्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन तज्ञ व्यक्तींव्दारे केले जाण्याची सुवीधा मिळते. जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनानी गेल्या २५ वर्षात वार्षीक सरासरी १५% ते ३०% परतावा तोही चक्रवाढ पध्दतीने दिलेला आहे. परत यात आपल्याला काही व्यवस्थापन करावे लागत नाही. तुमचा गुंतवणूक सल्लागार यासाठी म्युच्युअल फंडाची चांगली योजना निवडण्यास मदत करत असतो. मात्र जर का बाजारातील चढ-उतार, अस्थीरता या गोष्टींचे तुम्हाला वावडे असेल तर तुम्ही निश्र्चित उत्पन्न साधनात गुंतवणूक करणेच योग्य होईल.

आर्थीक नियोजन व उदिष्ठ ठरवीणे:

गुंतवणूकीसाठी शिस्तबध्द नियोजन व कोणत्या उदिष्ठपुर्तीसाठी गुंतवणूक करावयाची या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. यासाठी प्रथमत: तुम्ही तुम्हालाच काही प्रश्र्न विचारा: मी कीती काळ नियमीत गंतवणूक करु शकतो? याचा अर्थ तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करत असताना तुमचे सध्याचे वय काय आहे व तुम्ही तुमच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत नियमीत गुंतवणूक करु शकता या मधील काळ हा तुमचा गुंतवणूकीचा काळ असतो. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या कारणपुर्तीसाठी गुंतवणूक करत अहात हेही महत्वाचेच आहे. कारण काहीही असू शकते जसे कि घर/गाडी घेणे, गृह कर्ज घेताना स्वत:चा हिस्सा निर्माण करणे, दुसरे घर/प्रॉपर्टी घेणे, मुलांचे शिक्षण/लग्न, मोठ्या ट्रिपला जाणे, निवृत्तीनंतरची सोय इ. याचबरोबर अल्प मुदतीत आपली कोणती आर्थीक गरज भागवावी लागणार आहे याचा सुध्दा विचार करणे अत्यावश्यक असते. तुमची उदिष्ठ ठरवताना ती उदिष्ठ पुर्ण होण्याइतपत नियमीत गुंतवणूक तुम्ही किती करु शकता याचा नीटपणे विचार करा. उदिष्ठपुर्तीचा कालावधी सुध्दा नीटपणे निश्र्चित करा. यामुळे तु्म्ही तुमच्या गुंतवणूकीचे चांगल्याप्रकारे नियोजन करु शकाल.

काळ तुम्हाला अनुकूल आहे काय?

तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही किती काळ देऊ शकता? रोज काही तास कि महिन्यातील काही तास हेही महत्वाचे आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्हाल पैसे केव्हा लागणार आहेत यावरच गुंतवणूकीचा कोणता प्रकार तुम्ही निवडला पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी गुंतवणूकीच्या विवीध प्रकारातून मागील काळात कसा परतावा मिळाला आहे हे तुम्ही तपासले पाहिजे. मिळणा-या परताव्यावर कार दराने कर तुम्हाला लागतो याचाही विचार करणे महत्वाचे असते. जर का तुम्हाला पैसे १० वर्षानंतर किंवा त्यापेक्षा जास्त काळाने मिळून चालणार असतील तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. जर का तुम्हाला पुढील ५ ते १० वर्षात पैसे लागणार असतील तर तुम्ही बॉण्ड फंडात गुंतवणूक करणे योग्य होईल. जर का तुम्हाला २ ते ५ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही अल्प मुदतीच्या बॉण्ड फंडात किंवा एफएमपीमध्ये गुंतवणूक करणे योग्य होईल. जर तुम्हाला २ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही लिक्वीड फंडात किंवा बँक ठेवीत गुंतवणूक करणे योग्य होईल.

गुंतवणूकीचे नियोजन

एकदा का तुमचा गुंतवणूक सुरु करण्याचा निर्णय झाला कि प्रथमत: हे ठरवा कि तुम्ही किती पैशाची गुंतवणूक करु शकता. आता तुम्ही किती रक्कम प्रथमत: एकरकमी गुंतवू शकता ते पहा. यानंतर पुढे दरमहा नियमीत किती पैसे गुंतवणूकीसाठी बाजूला काढू शकता ते निश्चित करा. उत्पन्नाचे साधन कसे आहे, ते दरमहा ठरावीक आहे कि अनियमीत आहे हि गोष्ट सुध्दा तपासली पाहिजे. तुम्ही अचानक उभ्दवणा-या गरजेसाठी तरतुद केली आहे याची खात्री करा. एकदा का निर्णय झाला कि तुमच्या उदिष्ठाना पुर्ण करण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात करा व घेतलेल्या निर्णयाला चिकटून रहा. विचलीत होऊ नका.

लेखक – सदानंद

तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का ?

सर्वसामान्य माणूस शेअर बाजारातील तज्ञ होऊ शकतो काय?

होय, निश्र्चितच होऊ शकतो.
लोकांचा मात्र असा समज असतो कि सध्याच्या अस्थीर बाजारात काय आपला निभाव लागणे शक्य नाही. तसाच दुसरा असा समज आहे कि हे काम फक्त तज्ञ व्यक्तीच करु शकतात, माझे ते काम नव्हे, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हि गोष्ट खरीच आहे, अशावेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हेच तुमच्यासाठी योग्य होईल कारण तज्ञ फंड मँनेजर तुमच्यावतीने तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करत असतो, मात्र त्याच्यावर काही बंधने असतात, त्यातील महत्वाचे म्हणजे योजनेच्या उदिष्ठांनुसारच त्याला गुंतवणूक व्यवस्थापन करावे लागते, म्हणूनच म्युच्युअल फंडाची योजना निवडताना तिचे उदिष्ठ व मागील कामगीरी तपासून पहा. यासाठी चांगल्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घ्या. मात्र जर तुम्ही स्वत: तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यास वेळ देऊ शकत असाल तर तुम्हीच तज्ञाप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. तुम्ही हे निश्र्चितच करु शकता. त्यासाठी ह्या लेखातील व या पुढे मी देत असलेले लेख काळजीपुर्वक वाचा व त्याचा उपयोग तुमच्या गुंतवणूक व्यवस्थापनासाठी करा. प्रथमत: तुम्ही ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करु इच्छित आहात त्याची माहिती नीट होण्यासाठी खालील बाबी कशा तपासाव्या हे मी तुम्हाला प्रथम सांगतो.

विक्रीतील वाढ

कंपनीची विक्रीत दर वर्षी होणारी वाढ हा एक महत्वाचा घटक आहे. मागील वर्षापेक्षा किती टक्के विक्री वाढली आहे हे तपासा. नियमीत वाढ हे कंपनीच्या चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. जर विक्रीत घट झाली असेल तर त्याचे कारण तपासा, हा बदल तात्पुर्ता आहे कि दिर्घकाळ परिणाम करणारा आहे याची माहीती घ्या. विक्रीत होणा-या वाढीचा दर हा प्रत्येक सेक्टरसाठी वेगवेगळा असू शकतो उदा. एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्याच्या विक्रीची वाढ हि १०% दराने साधारणपणे होत असल्यास चांगली समजली जाते तर आयटी कंपनीची वाढ हि २०% पेक्षा जास्त असणे चांगले समजले जाते. हा निकष प्रत्येक सेक्टरसाठी वेग-वेगळा असतो. विक्रीच्या वाढ/घटीचा परिणाम शेअर्सच्या किंमती कमी/जास्त होण्याशी असतो. अपवाद बाजारातील तात्तपुर्ती तेजी/मंदी. नेहमी विक्रीत वाढ होणारी कंपनी तुम्हाला दिर्घकाळात तुमच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा देऊ शकते. मात्र विक्रीतील वाढ एवढा एकच निकष पुरेसा नाही अन्य गोष्टी सुध्दा तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या आता एक एक करुन पाहुया.

बॉटम लाईन ग्रोथ

बॉटम लाईन ग्रोथ म्हणजेच कंपनीच्या निव्वळ (नेट) नफ्यात होणारी वाढ. निव्वळ नफ्यात नियमीतपणे होणारी वाढ कंपनीची प्रगती दाखवते व याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीत वाढ होण्यात होतो. नफ्यातील वाढ हिसुध्दा सेक्टरनुसार वेगवेगळी असते. उदा. आयटी सेक्टरमधील चांगल्या कंपनीच्या नफ्यातील वाढ हि गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ ते ७०% असू शकते तर एफएमसीजी व जुन्या कंपन्यांच्या बाबत हि वाढ १० ते १५% सुध्दा चांगली मानली जाते.

आरओआय – रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट अर्थात गुंतवणूकीवरील परतावा:

म्हणजेच कंपनीने गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात किती परतावा मिळाला हे पहाणे. जर का एखाद्या कंपनीने रु.१०० कोटी मशिनरी, जमीन, मनुष्यबळ व अन्यत्र भांडवली गुंतवणूक केलेली असेल व जर त्या कंपनीला निव्वळ नफा रु.२५ कोटी वर्षात झालेला असेल तर आरओआय होईल २५%. परत आरओआय हा सुध्दा कंपनीच्या प्रकारावर पाहिला पाहिजे. आयटीसाठी तो ३५ ते ४० टक्के चांगला असेल तर भांडवली पीएसयुसाठी तो १० ते १५% चांगला समजला जातो.

व्हॉल्युम (उलाढाल):

काही तज्ञ कंपनीच्या शेअर्सच्या बाजारातील होणा-या रोजच्या रोजच्या व वर्षातील दररोजच्या सरासरी उलाढालीला महत्व देतात. यामुळे असे कळते कि त्या कंपनीच्या शेअर्सची रोज खरेदी विक्री किती संखेत होते. जर कंपनीच्या संबंधी एखादी महत्वाची बातमी बाजारात येते तेव्हा अचानकपणे त्या कंपनीच्या शेअर्सची
उलाढाल वाढते कारण मागणी एकतर चांगली बातमी असली तर वाढते व वाईट बातमी असेल तर मागणी कमी होते व याचा परिणाम शेअरच्या किंमतीत होणा-या वाढ-घटीवर होतो. शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या संखेने हेही समजते कि त्या शेअरची तरलता किती आहे. ज्या शेअरची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असे शेअर विकणेही सुलभ असते (कारण गि-हाईक समोर असते) तसेच यांच्या खरेदीवर होणारा खर्चही अल्प असतो. याच्या उलट ज्या शेअर्सची कमी किंवा क्वचीतच उलाढाल होते अशा शेअर्सच्या किंमतीत होणारा बदलही मोठा असतो म्हणून अश्या शेअर्सच्या शक्यतो वाटेलाच जाऊ नये. उलाढालीमुळे शेअर्सच्या मागणी व पुरवठ्याचीसुध्दा कल्पना येते ज्यामुळे किंमत कमी होणार आहे कि वाढणार आहे याचा प्राथमीक अंदाज येतो. जेव्हा अचानकपणे एखाद्या शेअरची किंमत वाढू लागली कि त्याचे कारण तपासले पाहिजे, एक कारण असे असू शकते कि कोणतातरी संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअर्सची खरेदी करु लागला असेल. तसेच किंमत कमी होण्याचे कारण याच्या उलट असते, तेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असतात.

मार्केट कँपिटलाझेशन (भांडवली बाजार मुल्य)

कंपनीच्या सर्व मिळून शेअर्सचे होणारे त्या वेळचे बाजार मुल्य (एकूण शेअर्स गुणीले प्रती शेअरचा दर). यामुळे कंपनी मोठी, मध्यम कि लहान आहे हे कळते. तसेच त्या शेअरची तरलतासुध्दा यामुळे अजमावता येते, जेवढे भांडवली बाजार मुल्य जास्त तेवढी तरलता जास्त असण्याची शक्यता असते. आपल्याला जर नियमीत व स्थिर परतावे मिळावे असे वाटत असेल म्हणजेचे तुलनेत कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर ज्या कंपनीचे भांडवली बाजार मुल्य सर्वात जास्त आहे अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, जर मध्यम जोखीम घ्यावयाची असेल तर मध्यम आकाराच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व जर जास्तच जोखीम घ्याव्याची असेल तर लहान कंपन्याचे शेअर्स घ्यावेत. म्हणजेच भांडवली बाजार मुल्य आपणास शेअर खरेदी करताना आपली जोखीम ठरविण्यास मदत करते

कंपनी व्यवस्थापन

खरे पहाता कंपनीचे व्यवस्थापन कोणत्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या हाती आहे हे पहाणे सर्वात महत्वाचे असते. यामुळे या व्यवस्थापनाच्या अन्य कंपन्या असल्यास त्यांची कामगिरी तुलनेसाठी फारच उपयुक्त ठरते. कंपनीचे व्यवहार किती पारदर्शक आहेत हे त्या कंपनीच्या व्यवस्थापनावरुनच समजते. त्यांची कंपनीकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे हेही फार महत्वाचे असते. म्हणूनच टाटा, बिर्ला, या समुहाला सर्वमान्यता जास्त असते. कंपनी कशी चालवावी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री. नारायण मुर्ती यानी चालवलेली इन्फोसीस हि कंपनी व व्यवस्थापन कसे नसावे याचे उदा. सत्यम कंपनी (आता ती महिंद्र गृपने घेतल्याने जुन्या भागधारकाना दिलासा मिळाला हि गोष्ट वेगळी). कंपनी कामगिरी कशी करणार हे पुर्णत: व्यवस्थापनावरच अवलंबून असते. जर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणा-या व्यक्ती या कार्यकुशल, प्रामाणिक व विश्वासार्ह असतील व ते जर अन्य चांगल्या कार्यरत असणा-या कंपनीच्या व्यवस्थापनेचा भाग असतील तर अशा कंपनीला मोठे गुंतवणूकदार नेहमीच प्राधान्य देत असतात. तसेच कंपनीचा एमडी कोण आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. यामुळेच आपण शेअर्स खरेदी करताना व्यवस्थापन कोणाचे आहे याला प्राधान्य दिले पाहिजे.

लेखक – सदानंद

निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे ?

कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते. विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून आपण त्या शेअरच्या किंमतीत, बाजाराच्या मुलत:च असलेल्या अस्थीर स्वभावामुळे, होणा-या चढ उतारामुळे आपले मन विचलीत होत नाही व चुकीच्या वेळी शेअर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय आपण घेत नाही. उलट अशा शेअरची किंमत जर कमी झाली तर ती एक चांगली संधी समजून आपण त्या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करतो व तेजीच्या काळात जास्त फायदा मिळवतो. दुसरा फायदा म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक हि दिर्घ मुदतीसाठीच जास्तकरुन फायदेशीर होते हे आपणास कळते व तसे आपण निर्णय घेतो.

पीएसआर (प्राइज टू सेल्स रेशो):

हा रेशो ३ पेक्षा कमी असलाच पाहिजे, खरं म्हणजे तो १ पेक्षाही कमी असेल तर चांगले. याच्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत व प्रती शेअर विक्री यांची तुलना करता येते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे कि जर का पीएसआर ३ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान होण्याचीच शक्यता (खात्रीच म्हणाना) जास्त असते व जर हा रेशो १ पेक्षा कमी असेल तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते. पीएसआर = शेअरची किंमत / प्रती शेअर मिळणारे मागील १२ महिन्याचे विक्रीचे उत्पन्न उदा.: क्ष लि. ची गेल्या १२ महिन्यातील एकूण विक्री = रु.१०० कोटी कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या १ कोटी म्हणून प्रती शेअर विक्रीचे उत्पन्न रु.१०० कंपनीच्या शेअरचे बाजार मुल्य रु.७५ प्रती शेअर पीएसआर = ७५/१०० = ०.७५

रिटर्न ऑन इक्वीटी:

याचा अर्थ तुमच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो, वॉरेन बफेट म्हणतो जर का तुम्हाला २०% च्या दरम्याने मिळत असेल तर तो चांगला समजावा. Return on Equity = Net Income/Shareholder’s Equity डेब्ट – इक्वीटी रेशो: हा रेशो कंपनीच्या स्वत:च्या भांडवलाशी कंपनीने घेतलेल्या कर्जाचे प्रमाण दाखवतो. कंपनीचे एकूण कर्ज / कंपनीचे एकूण शेअर भांडवल या सुत्राने हा काढला जातो. हा किमान ०.५ पेक्षा तरी कमी असणे उत्तम, परंतु १ असला तरी चालू शकते. मात्र जर का तो २ पेक्षा असेल तर धोक्याची घंटा समजावी. याचा अर्थ कंपनीला जास्त प्रमाणात कर्जावर व्याज द्यावे लागेल व त्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफा मिळवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल. म्हणून सगळेच कर्ज वाइट असते असे नव्हे जर का कर्जावरील व्याजाची फेड करुनही जर का कंपनीचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असेल तर कंपनी कर्जाचा उपयोग विस्तारीकरणावर किंवा उलाढाल वाढीसाठी प्रभावीपणे करत आहे असे समजले जाते. मात्र पायाभूत सुवीधा पुरवणा-या कंपन्यांचे बाबत हा रेशो वापरणे योग्य नसते कारण त्यांची उभारणीच मुळी उच्च डेब्ट इक्वीटी रेशोवर केलेली असते कारण त्याना लागणारे भांडवलाचे प्रमाणच जास्त असते.

बेटा:

इंडेक्सच्या तुलनेत शेअरची किंमत किती अस्थीर आहे हे बेटा फँक्टरमुळे कळू शकते. जेवढा बेटा जास्त तेवढे शेअरच्या किंमतीत जास्त चढ-उतार संभवतात. तर जर बेटा उणे असेल तर समजावे कि तो बाजाराच्या कलाविरुध्द वाढ घट दाखवेल म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असेल तेव्हा अशा शेअरची किंमत मात्र कमी होते व बाजार खाली जात असताना याची किंमत वाढते. ह्याची गणना करणे हे फारच किचकट असल्यामुळे मी याचे सुत्र येथे देत नाही मात्र तो बीएसईच्या साईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतो, http://www.bseindia.com/about/abindices/betavalues.asp या संकेतस्थळावर तुम्हाला कंपनीचा बेटा पाहाता येईल.

प्रतीशेअर उत्पन्न (Earning per share – EPS)

याच्यामुळे कंपनी प्रतीशेअर किती उत्पन्न मिळवते हे समजून येते आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मिळणारे प्रती शेअर उत्पन्न हेच जास्त महत्वाचे असते. इपीएस = कंपनीचा निव्वळ नफा / कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या या सुत्राने इपीएस काढला जातो. उदा. क्ष लि. चे २ कोटी शेअर्स आहेत व नफा जर रु.६ कोटी असेल तर इपीएस होईल रु.३ प्रती शेअर. याच्यामुळे कंपनी अल्पकाळात व दिर्घ काळात कशी ग्रोथ (वृध्दी) त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत करते हे समजून येते. म्हणून गुंतवणूक करण्यापुर्वी त्या सेक्टरमधील सर्व कंपन्याचा इपीएसची तुलना करणे अत्यावश्यक आहे.

पी / इ रेशो

कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना फक्त इपीएस पाहून चालत नाही तर त्याच बरोबर त्याची तुलना शेअरच्या बाजारभावाशी करणेसुध्दा अत्यावश्यक असते. यासाठी पी ई रेशो पहाणे महत्वाचे असते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना पी / ई रेशो हा महत्वाचा घटक असल्यामुळे आपण याची येथे जरा विस्ताराने व उदाहरणासह चर्चा करुया. पी / ई रेशो = शेअरचे बाजार मुल्य (किंमत) / गेल्या ४ तिमाहितील इपीएस उदा. क्ष लि. च्या शेअरचे बाजारमुल्य आहे रु.१०० आणि त्याचा इपीएस आहे रु.२० प्रती शेअर तर त्या शेअरचा पी ई होतो ५. कंपनीच्या इपीएस मध्ये नियमीतपणे जर मोठ्या प्रमाणावर वाढ होत असेल त्या शेअरची किंमतही वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होते. जर का त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत एखाद्या कंपनीच्या शेअरचा पी ई रेशो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक महाग असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. तेच जर पी ई कमी असेल तर तो शेअर गुंतवणूकीसाठी योग्य आहे असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. मात्र मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या शेअरचा पी ई रेशो जास्त आहे अशा शेअरची कामगिरी जास्त चांगली झालेली दिसून आलेली आहे. क्ष ह्या कंपनीचे सध्याचे प्रती शेअर उत्पन्न रु.१ असून त्या कंपनीची अपेक्षा आहे कि हे उत्पन्न भविष्यात वार्षीक २०% दराने वाढेल हे गृहित धरल्यास ५ वर्षानंतर कंपनीचे प्रती शेअर उत्पन्न असेल रु.२.५०. आता असे धरुया कि या क्षेत्रानुसार कंपनीचा पी / ई रेशो १५ हा गुंतवणूकदाराचे दृष्टीने योन्य आहे. म्हणून हा शेअर अपेक्षीत २.५० च्या इपीएस नुसार १५ पटीने विकला जाईल (२.५० गुणीले १५) म्हणजेच रु.३७.५० या किंमतीला विकला जाईल तो होतो चालू वर्षाच्या इपीएसच्या ३७.५० पट. येथे कंपनी २०% वार्षीक दराने उत्पन्नात वाढ अपेक्षीत असल्यामुळे (व या कंपनीची मागिल कामगिरीही सतत चांगली राहिलेली असल्यामुळे) गुंतवणूकदार हा शेअर भविष्यात मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून जास्त किंमतीला तो शेअर खरेदी करण्यास तयार असतो. अशा वेळी तो शेअर उच्च पी / ई (या वर्षीच्या तुलनेत) असूनही खरेदी केला जातो. याचाच दुसरा अर्थ चांगल्या व्यवस्थानाखालील, चांगल्या कामगिरीचा इतिहास असलेल्या व भविष्यात आकर्षक उत्पन्न देऊ शकणा-या म्हणजेच थोडक्यात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चांगल्या (वेलनोन) कंपनीच्या शेअरला तो जास्त किंमत मोजण्यास तयार असतो. रेशोंचे विश्लेषण आजकाल इंटरनेटवर अनेक साईटसवर उपलब्ध असते, प्रामुख्याने काही चांगल्या ब्रोकरच्या साईटवर, बीएसई व एनएसीच्या साईटवरही हे उपलब्ध असते या सुवीधेचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. मात्र जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल व हे काम तुमच्यावतीने एखाद्य तज्ञ व्यक्तीने करुन तुम्हाला दिर्घ मुदतीत शेअर बाजारापासून मिळणार फायदा मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या वेग वेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणा-या म्हणजेच डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत नियमीत दर महा एसआयपीच्या माध्यमातून दिर्घ मुदतीसाठी (साधारण ५ वर्षापेक्षा जास्त व उत्तम परताव्यासाठी १५ ते २० वर्षे) करणे हे अतिशय फायदेशीर होते. अशाप्रकारच्या चांगल्या योजनानी सरासरी वार्षीक २५% चक्रवाढ दराने १५ पेक्षा अधीक वर्षाचे काळात उत्पन्न दिलेले आहे. आणि अजून किमान ३० ते ४० वर्षे ते याच दराने मिळण्याची शक्यता आहे. रेशोंप्रमाणेचे कंपनीच्या फंडामेंटलचे विश्लेषण करणेही तेवढेच किंबहुना अधीक महत्वाचे आहे.

लेखक – सदानंद

फंडामेंटल विश्लेषण

फंडामेंटल विश्लेषण म्हणजे काय?

फंडामेंटल (मुळतत्वावर आधारीत) विश्लेषण म्हणजेच पारंपारीक बाबींचा विचार करुन व कोणत्याही प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह (भविष्यातील संभाव्य घटणांचा) विचार न करता केलेले विश्लेषण असे म्हणता येईल कारण हे दलाल स्ट्रिटवर होणा-या उलथापलथीशी संबधीत नसते व ते खालील तिन बाबींचाच विचार करुन केले जाते. १) अर्थव्यवस्था २) औद्योगीक वातावरण (उद्योग) ३) कंपनी मुळतत्वावर आधारीत विश्लेषण करताना वरील तिन्ही घटकांचा एकत्रीत पणे विचार करावा लागतो व वरीलपैकी कोणतीही एक बाब वगळून ते करता येत नाही. आता आपण ह्या तिन्ही बाबी काय आहेत हे पाहुया.

अर्थव्यवस्थेचे विश्लेषण

दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी अशीच वेळ चांगली असते ज्या वेळी बाजारात मंदी असते कारण याच वेळी साऱ्या शेअर्स चे बाजारमूल्य कमी झालेले असते व एका गुंतवणूकदारास ते कमी किमतीत मिळतात, मात्र हि स्थिती अल्पमुदतीच्या गुंतवणूकीसाठी जोखमीची आहे.

औद्योगीक जगताचे विश्लेषण

प्रत्येक औद्यगीक क्षेत्र हे ४ प्रकारच्या अवस्थेतून संक्रमण करत असते. १) सुरुवातीचा उभारणीचा कालखंड २) विस्तारिकरण व व्यवसाय वृध्दीचा कालखंड ३) स्थैर्याचा कालखंड ४) व्यवसायाच्या उतरीणीचा कालखंड जो गुंतवणूकदार त्या औद्योगीक क्षेत्राच्या सुरुवातीच्या उभारणीच्या कालखंडात त्या क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स घेतो त्याला सर्वाधीक फायदा मिळतो. जो विस्तारीकरण व वृध्दीच्या काळात गुंतवणूक करतो त्यालाही चांगला फायदा होतो. म्हणूनच जेव्हा स्थैर्याचा कालखंड सुरु होतो तेव्हा मिळणारा परतावा हा तुलनेने कमी होत असतो या साठी योग्यवेळी बाहेर पडून (शेअर्स विकून) फायदा मिळवणे फायदेशीर होते. औद्योगीक क्षेत्राला (सेक्टर) प्रतिकुल काळात उतरती कळा सुरु झाली कि त्या क्षेत्रातील कंपनीत गुंतवणूक करण्यात काहिच अर्थ नसतो. म्हणून ज्या क्षेत्रीय कंपनीत गुंतवणूक करावयाची असेल ते क्षेत्र सध्या कोणत्या स्थितीतून जात आहे हे पाहून मगच त्या क्षेत्रातील एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी कंपनीचे विवीध रेशो विश्लेषण करुन, विक्रीच्या उलाढालीतील बदल, नफा क्षमता इ. बाबींव्दारे तपासणी करुन मगच गुंतवणूक करावी.

कंपनीचे विश्लेषण

काही वेळा असे होते कि एखाद्या सेक्टरसाठी परिस्थिती अनुकूल असते तरीसुध्दा त्या सेक्टरमधील काही कंपन्याची कामगिरी म्हणावी तेवढी चांगली नसते किंवा अगदी सुमारही असते. तसेच त्या क्षेत्रातील काही कंपन्या इतरांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी करत असतात. म्हणूनच गुंतवणूकीचा निर्णय करण्यापुर्वी कंपनीचे विश्लेषण करणे आवश्यक असते. त्यासाठी खालील बाबी तपासून घ्याव्यात:
१) कंपनीचा इतिहास, मागिल काही वर्षातील कामगिरी व व्यवसायाचे स्वरुप. २) कंपनी करत असलेल्या उत्पादनांची बाजारातील मागणी नियमीत व वाढती आहे का ते तपासावे. ३) कंपनीचा बाजारातील हिस्सा (भांडवलाचा तसेच विक्रीचा). ४) व्यवस्थापन ५) कोणत्या उत्पादनांसाठी पेटंट / ट्रेडमार्क घेतलेले आहे ६) कोणत्या परदेशी संस्थेबरोबर भागिदारी आहे का? असल्यास तिची गरज काय व भविष्य कसे आहे? ७) बाजारातील सध्याचे व भविष्यातील स्पर्धक. ८) भविष्यातील व्यवसाच्या योजना. ९) भांडवलाच्या बाजार मुल्यानुसार कंपनी मोठी, मध्यम कि लहान गटात मोडते ते पहा. १०) मागील प्रकरणात सांगीतल्यानुसार रेशो विश्लेषण करावे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमचा निश्र्चित असा एक दृष्टीकोन असला पाहिजे. तुम्ही शेअरच्या किंमतीत होणा-या वाढीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्ही ग्रोथ स्टॉक खरेदी करुन तुम्हाला अपेक्षीत फायदा झाल्यावर ते विकून दुसरे वृध्दी शेअर्स खरेदी केले पाहिजेत. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीवर नियमीत चांगले उत्पन्न मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही ज्या कंपन्या नियमीतपणे चांगल्या दराने लाभांश देतात अशा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तसेच भविष्यात चांगली कामगिरी करु शकणारे दुर्लक्षीत शेअर्सची शोधून त्यात गुंतवणूक करुणे हेही तुमचे उदिष्ठ असू शकते. या तिन्ही प्रकारांवर एक धावती नजर टाकूया.

वृध्दी शेअर्स

या प्रकारात अशा कंपन्याचे शेअर्स मोडतात कि ज्या कंपन्याची विक्री व निव्वळ नफा हा उत्तम प्रकारे सतत वाढत रहाण्याचा संभव असतो. या कंपन्याची वृध्दी लक्षणीय असून त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांपेक्षा यांची प्रगती वेगाने होत असते. या कंपन्या अत्यंत कमी किंवा अजिबात लाभांष न देता होणारा फायदा परत व्यवसायातच गुंतवणूक करणे योग्य मानतात. अशा प्रकारातील कंपन्या या प्रामुख्याने अनेक दशके/शतके त्या व्यवसायात असतात व सतत उत्तम व्यवस्थापनाव्दारे चांगली कामगिरी करत असतात. उदा. हिंदुस्थान युनीलिव्हर, नेसले, इन्फोसीस, विप्रो अशा अनेक चांगली कामगिरी वर्षानुवर्षे करणा-या कंपन्या या प्रकारात मोडतात.

व्हँल्यू स्टॉक

काहि कंपन्या गुंतवणूकदारांकडून दुर्लक्षीलेल्या असतात कि ज्यांच्यामध्ये भविष्यात उत्तम कामगिरी होऊ शकते. अशा कंपन्याचे शेअर्सचे बाजारमुल्य अनेक कारणांमुळे फार कमी असते मात्र त्यांच्या मालकीची भविष्यात वृध्दी होऊ शकेल अशी, इमारत, जमिन, मालाचा साठा, उपकंपन्या अशी मोलाची मालमत्ता असते. असे स्टॉक शोधताना कमी पी / ई रेशो असणारे, जास्त डिव्हीडंड यिल्ड असणारे शोधावे लागतात. टेंपलटन म्युच्युअल फंड असे स्टॉक शोधून त्यांच्या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलीओमध्ये समाविष्ठ करण्यासाठी प्रसिध्द आहे. भविष्यात वृध्दी व चांगला लाभांश मिळण्यासाठी अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, मात्र असे शेअर्स कदाचीत जास्तकाळ तुम्हाला तुमच्या पोर्टफोलीओमध्ये सांभाळूण ठेवावे लागतील.

उत्पन्न देणारे शेअर्स

ज्या कंपन्या नियमीतपणे चांगला लाभांश देतात मात्र त्यांच्या शेअर्सचे बाजारमुल्य मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत नसते अशा कंपन्या काही गुंतवणूकदार नियमीत उत्पन्न मिळवण्यासाठी निवडत असतात. बाजारा मंदी असताना अशा कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे जास्त चांगले होते कारण त्यांचे बाजारमुल्य कमी प्रमाणात खाली वर होते व त्यांचा त्या काळात चांगला डिव्हिडंड यिल्ड असतो.

लेखक – सदानंद

काय करावे व काय करु नये?

शेअर बाजारात गुंतवणूक करताना काही गोष्टी नेमाने करणे आवश्यक असते, तसेच काही गोष्टी करणे टाळावे लागते. या बाबत या प्रकरणात चर्चा करुया.

नियमीत गुंतवणूक करत रहा

एकदा का तुमचा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय झाला कि प्रथम मागील काही प्रकरणात सांगीतल्यानुसार शेअर्सचे विश्लेषण करुन झाल्यावर गुंतवणूकीसाठी आपल्या उदिष्ठांनुसार कंपन्यांचे शेअर्स निवडावेत व गुंतवणूकीला सुरुवात करावी. एकदा का हा निर्णय पक्का केल्यावर निवडलेल्या शेअर्समध्ये नियमीतपणे जसा आपण एखाद्या कर्जाचा हप्ता भरतो अथवा आवर्ती खात्यात पैसे भरत रहातो तसेच हेच शेअर नियमीतपणे खरेदी करत रहा. बाजारात तेजी येवो अथवा मंदी तुम्ही विचलीत होऊ नका. गुंतवणूकीच्या वृध्दीसाठी दिर्घ काळ देण्याची मनाची तयारी ठेवा. तात्पुर्त्या नफा नुकसानीकडे फारसे लक्ष देऊ नका. एक लक्षात ठेवले पाहिजे कि शेअर हा जसा स्टॉक मार्केटचा अभिवाज्य भाग आहे तसाच तो कंपनीचा सुध्दा एक घटक आहे. बाजारात शेअर्सची किंमत कमी झाली तरी कंपनीचे प्रवर्तक तो विकत नसतात कारण त्याना त्याची किंमत समजत असते. तेजी अथवा मंदितही कंपनी आपला व्यवसाय करतच असते फक्त नफा मिळण्याच्या प्रमाणावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. आपण फक्त या गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे कि बाजाराच्या वाईट काळात कंपनी व्यवस्थापन कशाप्रकारे वर्तन करते, ते बाजारातून स्टॉक खरेदी करता आहेत कि विकत आहेत. जर व्यवस्थापन बायबँकची ऑफर आणत असेल तर खुशाल समजावे कि कंपनी भविष्यातील कामगिरीबाबत आश्वस्त आहे, अशा वेळी आपणसुध्दा तेच केले पाहिजे, अशावेळी खरेदी करा, भविष्यात बराच फायदाच होईल मात्र जर का व्यवस्थापन घसरणा-या किंमतीचे कारण लोकांना देण्यासाठी आत्मविश्र्वासपुर्वक पुढे येत नसेल व व्यवस्थापक त्यांचा भाग विकण्याच्या तयारीत असतील तर मात्र आपणही आपल्याकडील त्या कंपनीचे शेअर्स विकणे योग्य होईल, पण हि परिस्थिती जर तुम्ही आघाडीच्या (मल्टी कँप) भांडवलाचे चांगले (मोठ) बाजारमुल्य असेल तर हि वेळ शक्यतो येतच नाही. एक लक्षात ठेवा मंदिच्या काळात मोठ्या कंपन्याचे भावही खाली येतात पण परत जेव्हा अनुकुल काळ येतो तेव्हा त्यांचे मुल्यही मोठ्या प्रमाणावर वाढते. एक उदाहरण म्हणून सांगतो, मार्च २००९ मध्ये टाटा मोटार्सचा पुर्वी ज्या शेअरची किंमत रु.१५००/- होती ती रु.१०५ पर्यंत खाली आली होती, नंतर थोडा अनुकुल काळ आल्यावर ती परत रु.१५००/- च्या पुढे गेली होती, सध्या हा शेअर (एकाचे पाच या प्रमाणात स्पीट नंतर)तो २३० ते ३०० या दरम्याने उलाढाल करत आहे. जर तुम्हाला कंपनीबाबत काही प्रतिकूल बातमी समजली तर प्रथम बीएसई/एनएसी च्या संकेतस्थळावर तिची खात्री करा, तेथे काही बातमी नसेल तरीसुध्दा तुम्हाला काही शंका असेल तर कंपनीच्या इन्वेस्टर्स रिलेशन मँनेजरशी संपर्क करा व तेथून माहिती घ्या, कोणतीही चांगली कंपनी गुंतवणूकदारांपासून काहिही लपवून ठेवत नाही.

क्वाटिंटीपेक्षा क्वालीटी महत्वाची

कोणतेतरी शेअर्स फक्त स्वस्त आहेत व जास्त मिळत आहेत ते खरेदी करण्यापेक्षा फक्त चांगल्या कंपन्याचेच शेअर्स खरेदी करा मग महाग असल्यामुळे ते कमी मिळाले तरी चालतील. बरेच लोक स्वस्त शेअर्सची विचारणा करत असतात पण ते हे विसरतात कि अशा शेअर्समध्ये पैसे गुंतवून भविष्यात पस्तावण्याचीच वेळ येण्याची शक्यता जास्त असते. काहि नशीबवान लोक अशा व्यवहारातून पैसेही मिळवतात पण त्यांचे प्रमाण फार कमी असते. तसे काय काही लोकं लॉटरीचे बक्षीस मिळूनही श्रीमंत होतात पण त्यासाठी ५० लाख लोकाना पैसे गमवावे लागतात. १९९१ साली फक्त रु.१०००० चे इंफोसीसचे शेअर्स घेतले असतेत तर २००२ सालीच त्याची किंमत कोटीमध्ये झाली होती, अर्थात अशी कंपनी योग्य वेळी शोधणेही सोपे नसते. म्हणून अशी कंपनी शोधत बसण्यापेक्षा आज चांगल्या कंपनीचे शेअर्स नियमीत दिर्घ मुदतीसाठी खरेदी करत रहा, परत बाजारात तेजी हि येणारच आहे, कधी ते कोणी सांगू शकत नाही मात्र अर्थशास्त्राच नियम आहे जे वर जाते ते खाली येणारच व जे खाली येते तेही परत वर जाणारच. या सुत्रावरच हे जग शेकडो वर्ष चालू आहे.

आपली गुंतवणूक किती शेअर्समध्ये असावी?

उगाच अनेक कंपन्याचे शेअर्स विकत घेण्यापेंक्षा मोजक्याच चांगल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे त्यांच्या व्यवस्थापनासाठी सुलभ होते. तुमच्या गुंतवणूकीच्या रकमेशी निगडीत तुम्ही किती कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे याचे एक सोपे गणित खालीलप्रमाणे मी सुचवू इच्छितो. गुंतवणूकीची रक्कम रुपये

किती कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत

२०,००० पर्यंत १ ते २ २०,००० ते ५०,००० २ ते ३ ५०,००० ते २,००,००० ३ ते ५ २,००,००० ते ५,००,००० ५ ते ७ ५,००,००० पेंक्षा जास्त ७ ते १०

कायम लक्षात ठेवाव्यात अशा काही महत्वाच्या गोष्टी

१) जर एखादे अगदी नवीन व युनीक (वेगळी) उत्पादन अथवा सेवा प्रथमच घेऊन एखादी कंपनी भांडवली बाजारात उतरली तर अशा कंपनीच्या सुरुवातीच्या काळातच त्या कंपनीचे शेअर्समध्ये दिर्घ काळासाठी थोडीतरी गुंतवणूक करावी. यातूनच तुम्हाला एखादी इन्फोसीस, विप्रो, राजेश एक्सपोर्टसारखी कंपनी निर्माण होऊ शकेल. २) एका तरी चांगल्या बँकेचे शेअर्स आपल्या पोर्टफोलीओमध्ये कायम ठेवा. ३) चांगला पोर्टफोलीओ – १) बँक २) फार्मा क्षेत्र ३) एफएमसीजी क्षेत्र ४) आयटी क्षेत्र ५) ऑटो क्षेत्र ६) ऑईल व गँस क्षेत्र या साही क्षेत्रातील आघाडीच्या एक कंपनीचे काही शेअर्स आपल्याकडे असावेत, एकदम जमत नसेल तर थोडे – थोडे का होईना घेत रहा. प्रत्येकी एक शेअर दरमहा खरेदी करत रहा, याप्रमाणे नियमीत अनेक वर्षे करत राहिलात तरी चालेल. तुमचा एक उत्तम पोर्टफोलीओ तयार होईल. ४) जर एखादी अस्तित्वात असलेली चांगली व मोठी कंपनी एखादे नवीन उत्पादन/सेवा घेऊन येत असेल तर त्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या. ५) नेहमी जास्त रक्कम मोठ्या गृपच्या कंपनीतच गुंतवावेत. ६) शेअर बाजार जेव्हा उच्चांकी असतो तेव्हा हवसे, गवसे व नवसे एकदम शेअर बाजारात उतरू लागतात अशा वेळी आपण किमान आपली फायद्याची रक्कम तरी शेअर्स विकून बाजूला काढून ठेवावी. ७) जेव्हा मंदी येते तेव्हा हवसे, गवसे व नवसे एकदम शेअर बाजारातून पैसे काढून पळू लागतात तेव्हा आपण जरुर गुंतवणूक करावी. ८) म्युच्युअल फंडाच्या डायव्हर्सिफाईड – लार्ज कँप, मिड कँप व मल्टी कँप या तिन्ही प्रकारच्या चांगल्या कामगिरी करणा-या योजनेत एसआयपीव्दारे नियमीत दरमहा काही रक्कम दिर्घ काळासाठी गुंतवत रहावे.

लेखक – सदानंद

बाजाराची दिशा कशी ओळखावी?

शेअर बाजारात चढ उतार हे नित्याचेच असतात. जर तुम्ही या बाजारातील चढ उताराप्रमाणे स्वत:चे निर्णय बदलत राहिलात तर जसे व्यापारी त्याच्या व्यवसायातून नियमीत चांगला पैसा मिळवतो तसा तो तुम्ही शेअर बाजाराचा व्यापार करुन मिळवू शकता. व्यापारी माल विकत घेतो व विकतो, तसेच तो मालाचा साठा बाळगतो. व्यापारातही तेजी मंदी असतेच. मुरब्बी व्यापारी सदा-सर्वकाळ पैसे मिळवतो. त्या व्यापा-याचा दृष्टीकोन बाळगून जर व्यापार हा उद्देश बाळगून जर तुम्ही बाजारात उतरलात तर तुम्हीसुध्दा त्याच्यासारखेच उत्तम व नियमीत उत्पन्न या व्यापारातून मिळवू शकता. तुम्ही शेअर्स खरेदी कराल, विकाल व शेअर्सचाच स्टॉक ठेवाल. आता यासाठी काय गरजेचे आहे ते पाहुया. बाजाराची दिशा कोठे झुकते आहे? हे कसे ओळखावे?

मंदीची दिशा

नेहमीच रोजच्या रोज एनएसी ब बीएसई चा चार्ट पहा. किंमत व उलाढालीत झालेला बदल न्याहाळा. जेव्हा बाजारात मंदीचा मुड असतो तेव्हा विक्री जास्त वाढते. लार्ज कँप (मोठ्या) कंपन्यांच्या शेअर्स विक्रीमध्ये जास्त वाढ दिसू लागेल. अशावेळी आपल्याकडील जे शेअर्स सर्वात वाईट काम करत असतील ते प्रथम विकावेत. जर बाजार आणखीन खाली जाऊ लागला तर तुमच्याकडील अन्य शेअर्सही विकण्याचा प्रयत्न करा. जर का तुमच्याकडे असलेल्या शेअर्सपैकी जर एखाद्या शेअरची किंमत ८% किंवा जास्त दराने खाली आली तर तो शेअर लगेच विकून मोकळे व्हा कारण तो आणखी खाली जाण्याचीच शक्यता असते. अशावेळी जर तुम्ही ट्रेडर असाल तर सरासरी करण्याच्या भानगडीत पडू नका कारण यामुळे तुमचे नुकसान जास्त होईल.

तेजीची दिशा

सततच्या मंदीनंतर बाजार परत एकदा उसळी घेण्याचा प्रयत्न करेल. परंतू हि तेजी अल्पकाळाची आहे कि दिर्घ काळाची आहे हे तुम्ही एक दोन दिवसातच ओळखू शकत नाही, म्हणूनच या काळात शेअर्स खरेदी करणे टाळावे. दोन किंवा तिन दिवस बाजारात शेअर्सचा बंद भाव व उलाढाल जर सतत १% पेक्षा जास्तीचा दिसला तर बाजार तेजीच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे असे समजावे. सर्वसाधारणपणे ४ थ्या किंवा ७ व्या दिवशीसुध्दा जर हाच मुड कायम असेल तर बाजारात तेजीचा कल आहे असे समजावे. जर बाजारात अस्थीरता असेल तर या ७ दिवसातच तो विरुध्द कल दाखावयास सुरुवात करेल. अशा वेळी परत विक्रीचा जोर दिसू लागेल. हि परिस्थिती म्हणजे बाजारात दिर्घकाळ अस्थिरता संभवते. अशा वेळी बाजार ५ त १० टक्के खाली जाण्याची वाट पाहावी व मग खरेदी करावी व परत बाजार ५ ते १० टक्के वाढला कि शेअर्स विकून नफा मिळवावा. जेव्हा बाजारात नवीन रँली सुरु होते तेव्हा ती एकदम सगळ्या क्षेत्रात येत नाही तर आघडीच्या क्षेत्रातून प्रथम तेजी दिसू लागते व नंतर ती अन्य क्षेत्रातही पसरु लागते. यावेळी आघाडीच्या क्षेत्रात थोडे स्लो-डाऊन होऊ लागते व तेजी दुस-या क्षेत्रात परिवर्तीत होऊ लागते. तुम्ही सतत अभ्यास करत राहिलात कि याबाबत तुमची स्वत:ची मते तयार होऊन तुम्ही बाजारात परिपक्व होऊ लागाल. तेव्हा सुरुवातीच्या काळात जो पर्यंत तुम्हाला स्वत:ला बाजाराबाबत खात्री पटत नाही तो पर्यंत जास्त रक्कमही गुंतवू नका व जास्त जोखीमही स्विकारु शका. या काळात मर्यादीत नुकसान अथवा फायदा होईल असे पहा. म्युच्युअल फंड व अन्य संस्थात्मक गुंतवणूकदार काय करत आहेत याकडे लक्ष ठेवा, शक्यतो ते जसे वागत आहेत तसेच त्याच कलाने जर तुम्ही बाजारात व्यवहार केलेत म्हणजेच त्याच्यांशी जुळवून घेण्याची कला आत्मसात केलीत कि तुम्ही बाजारातून पैसे मिळवण्यासाठी योग्य दिशेने पावले टाकावयास लागलात असे समजण्यास हरकत नाही.

प्रवाहाबरोबर रहा, प्रवाहाच्या विरुध्द वागू नका.

ज्याप्रमाणे पोहणारा माणूस जर प्रवाहाच्या दिशेनेच पोहू लागला तर त्याची लवकर दमछाक होत नाही तेच प्रवाहा विरुध्द पोहोताना लवकर दमछाक होते. हिच गोष्ट शेअर बाजारालाही लागू होते. म्हणून बाजाराचा जसा कल असेल त्याप्रमाणेच तुम्ही तुमचे व्यवहार करा. तेजीमध्ये खरेदी करा, एक ठरावीक टक्के नफा झाला कि विकून मोकळे व्हा, परत प्रवाहाप्रमाणेच वागून नफा मिळवत रहा. मंदीचा प्रवाह असेल तर शॉर्ट सेलींग करा पण यातून रोजच्या रोजच व्यवहार पुरे करा अगदी थोडा नफा झाला तरी समधान माना. होणारा नफा परत परत बाजारातच गुंतवण्याची सवय लावा जेणेकरुन तुम्हाला चक्रवाढीचा फायदा होईल.

अस्थीर (व्होलाटाईल) बाजारात शेअर खरेदी करताना काय करावे?

अशा वेळी कोणताही कल २०% ते २५% याच्या पुढे टिकत नाही म्हणून १०% पेक्षा जास्त तेजी असेल तेव्हा खरेदी करणे थांबवावे व परत बाजार खाली येण्याची वाट पाहून, तो परत खालच्या स्तरावर आला कि खरेदी करा व नफा झाला कि लगेच तो पदरात पाडुन घ्या. हे अस्थिर कालखंडात सतत करत रहावे, शक्यतो शॉर्ट सेलींग करु नका कारण यात फार जास्त जोखीम असते. खरेदी केल्यानंतर नुकसान झाले तर सरासरी करण्याचा पर्याय असतो तसेच किंमत वाढेपर्यंत थांबण्याचाही पर्याय तुमच्याजवळ असतो जो शॉर्ट सेलींगमध्ये नसतो म्हणूनच हि गोष्ट टाळा.

धोक्याचे इशारे

बाजारात मुख्यत्वे तेजीच्या कालखंडात धोक्याचे अनेक इशारे दिसतात तेव्हा विशेष काळजी घेतली पाहिजे. पहिला धोक्याचा इशारा म्हणजे जेव्हा सगळेच बाजारात एकदम प्रवेश करु लागतात. दुसरे म्हणजे सगळ्यानाच बाजारात तेजी असल्याचा साकशात्कार होऊ लागतो. बरेच लोकं त्यांच्याकडील सर्वच पुंजी या काळात बाजारात ओततात (हेच लोकं नंतर जास्त पस्तावतात हि बाब अलाहिदा), जोपर्यंत सगळीकडून पैशाचा ओघ चालू असतो तोपर्यंत हे ठिक असतं तो थोडा आटला कि मगच विपरीत होते. या पुढचा इशारा म्हणजे अर्थव्यवस्थेतील बदलणारी परिस्थिती, या वेळी सरकार निर्णय घेण्यास एक तर कुचराई तरी करते किंवा दिरंगाई करते अथवा निर्णयच घेत नाही. यापुढचा इशारा म्हणजे सेन्सेक्स नेमाने नवीन नवीन उच्चांक पार करु लागतो. लक्षात ठेवा हे फार काळ चालू शकत नाही. इथेच समजा कि आता ब्रेक लागण्याची वेळ नजीक येऊन ठेपली आहे. तुम्ही सावध व्हा. आपण सगळ्याना तर आत्महत्या करण्यापासून रोखू शकत नाही पण स्वत:ला तर रोखू शकतो कि नाही? याकाळात आणखीन एक इशा-याची बाब म्हणजे काही शेअर्सचे (प्रामुख्याने आयटी सेक्टर) शेअर्सचे भाव एवढे वाढतात कि त्यांच्या इपीएस व पि ई रेशोत ते कोठेच बसत नाहीत हा इशारा अजिबात दुर्लक्षीत करु नका. आणखीन एक धोक्याचा इशारा याच काळात मिळतो तो म्हणजे जो तो आयपीओ बाजारात गर्दी करावयास लागतो, एकापाठोपाठ दुसरा असा जणू आयपीओचा भडिमार होतो, या आयपीओकडे दुर्लक्ष करणेच योग्य कारण नंतर मंदिच्या काळात यातील बहूतांशी शेअर्सचा भाव हा अगदी ९०% पर्यत कमी होतो. २००७ मध्ये आलेले आयपीओची आज काय दयनीय अवस्था आहे ते पहा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तेजी कायम टिकणार नाही तसेच मंदीही कायम टिकणार नाही. दोन्ही गोष्टी एकामागून परत परत रहाटगाड्याप्रमाणे चालूच असतात. बाजारात दोन गोष्टी नेहमी अस्तित्वात असतात एक म्हणजे भीती व दुसरी म्हणजे मोह/लोभ. बाजारात तेजी तेव्हाच येते कि जेव्हा ते मंदीच्या भीतीची भींत ओलांडण्यात यशस्वी होतात. दोन्हीचा मध्य एकदा का जमला कि तुम्ही यशस्वी झालातच.

लेखक – सदानंद

तुमचा पोर्टफोलीओ कसा बनवावा?

संपत्ती निर्माण करावयाची असेल तर आपल्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन अत्यंत हुषारीने केले पाहिजे त्यासाठी पहिली गोष्ट हि केली पाहिजे कि आपला पोर्टफोलीओ चांगल्या प्रकारे बनवता आला पाहिजे. या प्रकरणात आपण हिच गोष्ट शिकणार आहोत.

गुंतवणूकीच्या विकेंद्रीकरणाचे महत्व.

आपली गुंतवणूक विवीध साधनात विभागून आपण बाजाराच्या विपरीत काळात आपल्या गुंतवणूकीचे संरक्षण करु शकतो. निरनिराळ्या गुंतवणूक प्रकारात रक्कम विभागल्यामुळे गुंतवणूक मुल्यात होणा-या चढ उतारावर मात करता येते. शेअर बाजारात आयटी व मेडिया क्षेत्रातील शेअर्सच्या किंमतीत सर्वात जास्त अस्थिरता असते म्हणूनच शेअर बाजारातसुध्दा तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील बचावत्मक कंपन्यांचे स्टॉक, जसे कि एफएमसीजी स्टॉक, तुमच्याकडे असतील याची काळजी घेतली पाहिजे. याचप्रमाणे तुम्ही बॉण्डस् व एफडी यासारख्या निश्र्चित उत्पन्न साधनामध्ये सुध्दा गुंतवणूक केली पाहिजे. पोर्टफोलीओ व्यवस्थापनाचे प्राथमीक उदिष्ट हे असले पाहिजे कि जेणे करुन १) मुद्दल सुरक्षीत राहिल २) स्थिर उत्पन्न मिळावे ३) मुद्दलात चांगली वृध्दी व्हावी ४) तरलता – जेणेकरुन बाजारात जेव्हा संधी असेल तेव्हा याच पैशांचा लगेच उपयोग करुन संपत्ती निर्माण करता आली पाहिजे व ५) विकेंद्रीकरण अर्थात डायव्हर्सिफिकेशन. विकेंद्रिकरण म्हणजे आपण एकाच प्रकारची जोखीम असणारे सारे शेअर्स खरेदी न करता वेगवेगळ्या प्रकारची जोखीम असणारे विवीध कंपन्यांचेच स्टॉक खरेदी केले पाहिजेत. थोडक्यात जर तुमची गुंतवणूकीची रक्कम रु.५ लाख असेल तर ती किमान ५ वेगवेगळ्या क्षेत्रातील ५ टॉपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विभागलेली असली पाहिजे. याच बरोबर अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिक्वीड फंडात व निश्र्चित उत्पन्न देणा-या साधनातही गुंतवणूक केली पाहिजे.

आपला गुंतवणूकीचा पोर्टफोलीओ वयानुसार कसा असावा

तुमच्या चालू वयानुसार गुंतवणूक कशी विभागली पाहिजे ते खालील तक्त्यात दाखवले आहे (हा जरी हार्ड व फास्ट रुल नसला तरी ह्याची मदत घेणे हेच अंतीमत: फायदेशीर होते हे अभ्यासाने सिध्द झालेले आहे). वय पोर्टफोलीओतील गुंतवणूकीचे प्रमाण वय वर्षे ३० पेक्षा कमी ८०% शेअर्स अथवा इक्वीटी म्युच्युअल फंडात १०% रोख (लिक्वीड फंडात) १०% निश्र्चित उत्पन्न साधनात वय वर्षे ३० ते ४० ७०% शेअर्स अथवा इक्वीटी म्युच्युअल फंडात १०% रोख (लिक्वीड फंडात)
२०% निश्र्चित उत्पन्न साधनात वय वर्षे ४० ते ५० ६०% शेअर्स अथवा इक्वीटी म्युच्युअल फंडात १०% रोख (लिक्वीड फंडात) ३०% निश्र्चित उत्पन्न साधनात वय वर्षे ५० ते ६० ५०% शेअर्स अथवा इक्वीटी म्युच्युअल फंडात १०% रोख (लिक्वीड फंडात) ४०% निश्र्चित उत्पन्न साधनात वय वर्षे ६० च्या पुढे ४०% शेअर्स अथवा इक्वीटी म्युच्युअल फंडात १०% रोख (लिक्वीड फंडात) ५०% निश्र्चित उत्पन्न साधनात वरील प्रमाणेच आपला पोर्टफोलीओ असा काही लिखीत नियम नाही मात्र याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. तुम्ही किती प्रमाणात जोखीम स्विकारु शकता हे महत्वाचे असते, जर तुमची मानसीकता जास्त जोखीम स्विकारण्याची असेल तर तुम्ही इक्वीटीमध्ये जास्त गुंतवणूक करु शकता व जर तुमची मानसिकता कमीत कमी जोखीम स्विकारण्याची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त रक्कम निश्र्चित उत्पन्न देणा-या साधनात केली पाहिजे. परंतु प्रत्येक गुंतवणूकदाराने किमान काही तरी रक्कम शेअर्स अथवा म्युच्युअल फंडात गुंतवली पाहिजे तरच भविष्यात महागाईमुळे रुपयाच्या किंमतीत होणा-या अवमुल्याने होणारे नुकसान काही प्रमाणात कमी करु शकता. कारण इक्वीटी हे एक असे गुंतवणूकीचे साधन आहे कि जे दिर्घ काळात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते. याप्रमाणे जर तुम्ही एफडी अथवा बॉण्डमध्ये गुंतवणूक करु इच्छित असाल तर किमान वेगवेगळ्या काळानंतर मुदतपुर्ती होईल याची काळजी घ्या जेणेकरुन व्याज दरातील होणा-या बदलांचा परिणाम कमीत कमी होईल. तुम्ही तुमच्या पोर्टफोलीओचा ठरावीक काळानंतर आढावा घेणे आवश्यक असते ज्यामुळे कि कोणत्या साधनातील गुंतवणूकीपासून तुम्हाला अपेक्षीत परतावा मिळत आहे व कोणत्या साधनातील गुंतवणूक पुढे चालू ठेवावी कि बदलावी हे तुम्ही ठरवू शकता. हा काळ किती असावा हे तुमच्या गुंतवणूकीची रक्कम किती आहे व तुम्ही किती वेळ देऊ शकता यावर ठरवावा. महिन्यातील किमान एखादा दिवस तरी या कामासाठी राखीव ठेवावा. यासाठी खालील बाबीना महत्व द्यावे: १) तुम्ही केलेल्या गुंतवणूकीपासून तुम्हाला किती टक्के परतावा (फायदा) मिळाला आहे, तो बाजारातील व्याजदरापेक्षा किती प्रमाणात कमी किंवा जास्त आहे हे तपासा. २) शेअर बाजारातील गुंतवणूक दिर्घकाळासाठीच असल्यामुळे त्यातून नफा अथवा नुकसान झाले तरी लगेच शेअर्स वरचेवर विकू नका. ३) तुमची शेअर्समधील गुंतवणूक ज्या ज्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये असेल त्या क्षेत्राच्या संबधात सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करतील असे काही धोरणात्मक बदल, जसे कि सरकारी निर्णय/धोरण, करातील बदल, जागतीक परिस्थिती, विक्रीतील बदल, व्याज दरातील बदल, मागणी-पुरवठ्यातील बदल, उलाढालीतील बदल इ. गोष्टी ज्यामुळे त्या क्षेत्रातील कंपनीच्या निव्वळ नफ्यावर काय परिणाम होऊ शकतो याची तपासणी करा. ४) जर एखाद्या क्षेत्राल प्रतिकुल काळ असेल व त्याचवेळी दुस-या एखाद्या क्षेत्राला अनुकुल काळ असेल तर
तुमची गुंतवणूक त्यानुसार प्रतिकुल क्षेत्रातून, अनुकुल क्षेतात वर्ग केली पाहिजे. ५) शेअर्समध्ये एकसारखे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नका ते तुम्हाला फायदेशिर नसून फक्त ब्रोकरसाठी फायदेशीर असते हे लक्षात ठेवा. ६) गुंतवणूक करताना फक्त चांगली व मोठी उलाढाल व चांगला नफा मिळवण्या-या मोठ्या आकाराच्या (भांडवली मुल्याच्या) व चांगले व्यवस्थापन असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्येच गुंतवणूक करा. ७) म्युच्युअल फंडाच्या मागील किमान ५ वर्षे सतत चांगली कामगिरी असलेल्या डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत एसआयपीमधून नियमीत गुंतवणूक करा. ज्या म्युच्युअल फंड कंपनीच्या सर्वात जास्त योजना चांगल्याप्रकारची सतत कामगिरी करत असतील अशीच कंपनी गुंतवणूकीसाठी निवडावी. ८) म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेतही नियमीत गुंतवणूक करावी, यासाठी फ्लोटिंग इंटरेस्ट रेट योजना, शॉर्ट टर्म बॉण्ड फंड, लिक्वीड फंड या प्रकारतील योजना निवडावी. ९) बँकेच्या एफडीसोबत काही रक्कम म्युच्युअल फंडाच्या एफएमपी या समतुल्य योजनेत गुंतवणूक करावी ज्यामुळे तुमच्या करदाईत्वात बचत होईल. १०) टँक्स प्लानींग करुन करात बचत करणे म्हणजे पैसे वाचवणेच, म्हणून अशा साधनात गुंतवणूक करा कि ज्यात तुम्हाला कर बचतीचा फायदा मिळेल.

लेखक – सदानंद

शेअर बाजारात व्यवहार करण्याचा एक सोपा मार्ग

अनेक व बहुतांशी व्यक्ती कोणाच्या तरी सांगण्यावरुन अथवा उत्सुकता म्हणून शेअर बाजारात पडतात (दोन्ही अर्थाने). मग पस्तावतात, नाद सोडून देतात. पण खरच शेअर बाजार माझ्यासाठी उपयोगी आहे काय? मी यातून संपत्ती निर्माण करु शकतो काय? या बाबत किती लोकं सिरिअसली विचार करतात. तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुम्हाला हा लेख उपयुक्त आहे. (मात्र ज्याना अगोदरच शेअर बाजारातले बरेच काही कळते वा जे तज्ञ आहेत त्यांचे साठी हा लेख कवडी मोलाचा आहे, त्यानी म्या पामराला क्षमा करावी).

खरेदी करा व विसरुन जा

देशातील एनएसीवर लिस्टींग झालेल्या पहिल्या पन्नास पैकी बँकींग सेक्टर मधील एक कंपनी, आयटी मधील एक कंपनी, ऑटो मधील एक कंपनी, पिएसयु मधील एक कंपनी, फार्मामधील एक कंपनी, एफएमसीजी मधील एक कंपनी अशा एकूण ६ प्रमुख आघाडीच्या कंपन्याची निवड करा (कंपन्यांची संख्या वगैरे तुमच्या क्षमतेनुसार कमी जास्त करा, सेक्टरची निवड तुमच्या वयानुसार व जोखिम स्विकारण्याच्या तयारीनुसार करा). या सर्व कंपन्यांचे प्रत्येकी आपल्या गुंतवणूकीच्या क्षमतेनुसार जेवढे खरेदी करता येतील तेवढे शेअर्स खरेदी करा. शक्य असल्यास प्रत्येक कंपनीचा किमान एक तरी शेअर प्रत्येक महिन्याला खरेदी करा व विसरुन जा. तुम्ही प्रथमत: गुंतवणूकीसाठी कंपनी निवडताना ती पहिल्या ५० पैकी असून तिला स्थापना होऊन किमान १५ ते २० वर्षे तरी झालेली आहेत अशीच निवडा. त्या कंपनीचे व्यवस्थापन हे अनुभवी, चांगले व्यावसाइक व पारदर्शी असावे. कंपनी नियमीत नफा मिळवणारी असावी. कंपनीची उलाढाल व नफा सतत वाढता आहे याची खात्री करा. आता तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहात म्हणजेच त्या कंपनीचे तुमच्याकडील शेअर्सच्या प्रमाणा इतके भागिदार झाले आहात हे पक्के समजा व सच्चा भागिदार हा वरचेवर शेअर्स विकत नसतो हे लक्षात ठेवा. टाटा, बिर्ला, अंबानी हे कधी त्यांच्या कंपनीचे स्वमालकीचे शेअर्स विकतात काय? तुम्ही सुध्दा त्यांच्याप्रमाणेच विचार करा म्हणजे तुम्हालाही शेअर्स विकण्याची बुध्दी होणार नाही.

हे आवर्जुन करा

जेव्हा जेव्हा बाजारात मंदी येवून तुम्ही घेतलेल्या शेअर्सचे भाव कमी होतील तेव्हा तुमच्याकडे असणारी रक्कम यात अवश्य गुंतवा व शेअर्सची संख्या वाढवा. नियमीत अथवा जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच पुर्वी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचेच शेअर्स खरेदी करा. आपल्याकडील अतिरिक्त रक्कम शेअर बाजारात गुंतवा.

हे करु नका

शेअर्स विकू नका. वारंवार शेअर्स खरेदी विक्री म्हणजेच ट्रेडींग करु नका. डे-ट्रेडिंग अजिबात करु नका, हे फक्त ब्रोकरसाठी फायदेशिर व तुमचे नुकसान करणारे होते. अफवांवर विश्वास ठेवू नका. लोकांच्या टिपस् वर विसंबू नका. कर्ज काढून शेअर्स खरेदी करु नका.

लक्षात ठेवा

बाजारात मंदी अथवा तेजी असली तरी या कंपन्या त्यांचा व्यवसाय चालूच ठेवत असतात. नियमीत नफा मिळवत असतात. नियमीत लाभांश देत असतात. हे शेअर्स बाजारात मंदी आली व शेअरची किंमत कमी झाली तरी अथवा तेजी आली व किंमत वाढली तरी तुमच्याकडील असणारे शेअर्स विकू नका. आंबा, नारळ इ. दिर्घकाळ चांगले व नियमीत उत्पन्न देणारी बहुतांशी झाडाना फळ धारणा होण्यासाठी १० ते १५ वर्षे लागतात, तसेच तुम्ही गुंतवलेल्या शेअर्सवरचा लाभ चांगला मिळण्यासाठी काही वर्षे द्यावीच लागतील. लवकर सुरुवात करा तुम्हाला नोकरी अथवा व्यवसायातून नियमीत दर महा उत्पन्न मिळू लागले कि लगेचच तुमच्या उत्पन्नापैकी काही ठरावीक रक्कम नियमीतपणे कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवावयास सुरुवात करा. लवकर व तरुणपणी सुरुवात करण्याचा फायदा हा आहे कि, सुरुवातीच्या काळात जास्त जबाबदा-या नसतात तेव्हा जास्तीत जास्त रक्कम या प्रकारे नियमीत दरमहा गुंतवता येईल. तरूण वय असल्यामुळे जोखिम स्विकारण्याकडेही कल असतो. तुमचे उत्पन्न जस जसे वाढत जाईल त्या प्रमाणात गुंतवणूकही वाढवत न्या. लग्ना नंतर व होम लोन वगैरे हप्ते सुरु झाल्यावर गुंतवणूक कमी करावी लागेल, म्हणून आत्ताच सुरुवात करा. तुम्ही फक्त नियमीत शेअर्स खरेदी करत रहा, त्याच्या भावाकडे अजिबात पाहू नका. मनाशी पक्के ठरवा कि तुम्ही तुमच्या भविष्यात चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करत आहात.

काय परतावा मिळेल?

१) दर वर्षी या आघाडीच्या कंपन्या, त्याना होणा-या नफ्यापैकी काही रक्कम डिव्हीडंड (लाभांश) म्हणून समभागधारकाना देतात. हे तुमचे करमुक्त उत्पन्न असते. तसे पहाता सुरुवातीला हे उत्पन्न फारच नगण्य वाटेल. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागेल. २) या कंपन्या जेव्हा केव्हा बोनस शेअर देतील तेव्हा तुमच्याकडील शेअर्सची संख्या त्या प्रमाणात वाढेल व मिळणारे लाभांशाचे उत्पन्नही वाढत जाईल. ३) या कंपन्या काही वेळा राईट इशु आणतात, तेव्हा बाजारापेक्षा कमी भावाने तुम्हाला शेअर्स मिळतात. ४) या कंपन्या काही वेळा शेअर्स स्पि्लट करतात, या वेळीही तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढेल. ५) तुमच्याकडे जेवढे जास्त शेअर्स तेवढे तुमचे लाभांशाचे उत्पन्न जास्त मिळते. ६) तुम्ही प्रथमत: गुंवणूकीला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लाभांश मिळेल त्याचे प्रमाण फारच अल्प म्हणजे १.५% ते ३% (तुमच्या गुंतवणूकीच्या तुलनेत) एवढेच मिळेल. ७) जस जसे तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढत जाईल व काही (किमान २०) वर्षे निघून जातील तेव्हा मिळणारा वार्षीक लाभांश हा सरासरी २५% ते १००% (किंवा या पेक्षा जास्त सुध्दा) या प्रमाणात (तुमच्या गुंतवणूकीवरील प्रमाणानुसार) काळानुसार वाढत जाईल. ८) जर तुम्ही तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात वयाच्या २० ते २५ या दरम्याने केलेली असेल व जर तुम्ही नियमीतपणे वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करत रहाला तर नंतर दर वर्षी मिळणारे लाभांशाचे उत्पन्न तुमच्या सा-या गरजा भागवू तर शकेलच, परत तुमच्याकडे चांगली संपत्ती (शेअर्सचे मुल्य) निर्माण झालेली असेल.

लेखक – सदानंद

डेरिव्हेटिव्हज मार्केट - वायदे बाजार

फ्युचर्स व ऑपशन्स

वायदे बाजार हा शेअर बाजाराशी निगडीत असलेला विभाग असल्यामुळे याची माहिती शेअर बाजारात व्यवहार करु इच्छिणा-या प्रत्येकालाच असणे अत्यावश्यक आहे. या प्रामुख्याने दोन विभाग येतात: १) फ्युचर्स २) ऑपशन्स आपण या विभागातील फ्युचर्सची माहिती प्रथम करुन घेऊया. या विभागात दर गुरुवारी एक लेख या प्रमाणे प्रसिध्द करण्याचा माझा विचार आहे. वायदे बाजार

फ्युचर्स

प्रकरण १ ले १) फ्युचर्स सौदे (वायदे बाजार) – तोंड ओळख तुम्हाला माहितच असेल कि लेहमन ब्रदर्स सारख्या अनेक संस्था (इनव्हेस्टमेंट बँकर्स) मागील काही काळात ज्या दिवाळखोरीत गेल्या अथवा आर्थीक अडचणीत आल्या त्याचे एक महत्वाचे कारण होते डेरिव्हेटीव्ह बाजार म्हणजेच फ्युचर्स आणि ऑपशन्स ज्याला मराठीत वायदे बाजार असे म्हटले जाते. एखाद्या वस्तूची, शेअर्सची, मालमत्तेची, करन्सी वगैरे कोणत्याही वस्तूची भविष्यातील किंमत काय असेल याचा अंदाज बाधून वायदे बाजारात व्यवहार केले जातात. गेल्या दोन शतकात अनेकानी या माध्यमातून अतीशय चांगला फायदा बाजाराच्या या व्यवहारातून मिळवलेला आहे हि सुध्दा एक वस्तुस्थिती आहे. या प्रकारातील जागतीक बाजारातील रोजची उलाढाल लाखो करोड रुपयांची असते. या विभागात व्यवहार करताना पुरेसे ज्ञान मिळवून जर का व्यवहार केले तर चांगला फायदा मिळवता येतो कारण यातील सुरुवात करण्यापुर्वी तुम्हाला डेरिव्हेटीजमध्ये असणारी किचकट गणिती तत्वे तुम्ही समजून घेतली पाहिजेत, त्या शिवाय भविष्यातील दर ठरवण्याची कला तुम्हाला समजू शकणार नाही.

डेरिव्हेटीव्हज (वायदे बाजार) कशासाठी?

आर्थीक विषयात डेरिव्हेटीजचा उपयोग हा अतीशय महत्वाचा घटक आहे. याच्यामुळे जोखीमीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास डेरिव्हेटीव्हज उपयोग जोखमीच्या विम्यासाठी केला जातो. उदा. आज एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव रु.३००/- प्रती शेअर आहे व काही काळानंतर त्या शेअरची किंमत एकतर वाढेल अथवा कमी होईल. मात्र मला काहिही झाले तरी एकतर नफा व्हावा किंवा जर नुकसान झालेच तर ते मर्यादित असावे म्हणून या शेअरचा व्यवहार आपण वायदे बाजारात करतो ज्यात वायदे बाजारात आपण जर एक महिना, तीन महिने अशा मुदतीने रु.३२०/- या दराने विकावयास व सोबतच रु.२८०/- या दराने खरेदी करावयास ठेवला व जर शेअरची किंमत जर रोखीच्या बाजारात वाढली तर तो लगेचच विकून आपण फायदा मिळवू शकू व जर भविष्यात शेअरची किंमत कमी झाली तर त्यावेळी बाजारात तो शेअर खरेदी करु शकतो ज्यामुळे काहिही झाले तरी थोडा नफा मिळवणे शक्य होईल अथवा किमान पक्षी जर का नुकसान झाले तर ते आपण कमी करु शकतो. नंतरच्या प्रकरणातून हे मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. एक लक्षात ठेवले पाहिजे कि वायदे बाजारातील जोखीम हि सुध्दा रोजच्या रोजच बदलत असते, त्यामुळे असे व्यवहार करताना त्यावर रोजच लक्ष ठेवणे गरजेचे असते. वायदे बाजारातील व्यवहारांचा उपयोग प्रामुख्याने हेजींगसाठी (होणारे नुकसान कमी करण्यासाठी) केला जातो. वायदे बाजारातील व्यवहार नीटपणे समजणे गरजेचे असल्यामुळे मी मुद्दामच लहान लहान लेखातून हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न येथे करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हा विषय नीट समजून घेणे सोईचे होईल. वायदे बाजारात दोन प्रमुख विभाग येतात ते म्हणजे फ्युचर्स व ऑपशन्स दोघांची कार्यपध्दतीत थोडा फरक आहे. प्रथमत: आपण फ्युचर्स या विभागात कशा प्रकारे सौदे केले जातात ते सविस्तरपणे पुढील प्रकरणातून पाहूया. प्रथमत: आपण डेरिव्हेटिव्हजचा उपयोग व्यवहारात कसा केला जातो हे आपण पुढील प्रकरणात पाहू.

लेखक – सदानंद

वायदे बाजाराचा व्यवहारातील उपयोग

फ्युचर्सचे व्यवहार जवळपास सर्वच प्रकारच्या व्यवहारांसाठी केले जातात, ज्यामध्ये करन्सी (नाणे बाजार उदा. युरो, डॉलर, येन इ.), कमोडिटी (सोने चांदी, तांबे, डाळी, धान्य, कडधान्य इ. कोणत्याही वस्तू), शेअर्स (कंपन्यांचे समभाग), बॉण्डस् इ. सारे काही. भविष्यात एखाद्या गोष्टीचे भाव काय असतील त्याचा अंदाज घेऊन या प्रकारातील व्यवहार केले जातात त्याना वायदा किंवा करार असेही म्हणता येईल. उदा. राजेशने इंडियन ऑईल कंपनीच्या शेअरच्या भविष्यातील उदा. एक महिन्यानंतरच्या भावावर आधारीत फ्युचर कॉन्ट्रँक्ट खरेदी केले (वायद्याचा करार केला) आता सौदापुर्तीच्या दिवशी जर का त्या शेअरचा भाव रु.१००० ने वाढला तर त्याला रु.१००० इतका फायदा होईल, जर किंमत रु.८०० ने कमी झाली तर त्याला रु.८०० एवढे नुकसान होईल. वायदे बाजारात प्रामुख्याने तीन प्रकारे सौदे केले जातात. १) फॉरवर्ड आणि फ्युचर्स २) ऑपशन्स ३) स्वँप

फॉरवर्ड कॉन्ट्रक्ट (पुढील तारखेचा करार)

वायदे बाजारातील फॉरवर्ड कॉन्ट्रक्ट (पुढील तारखेचा करार) म्हणजेच भविष्यातील वायद्याचा व्यवहार हि डेरिव्हेटीव्हजमधील सर्वात सोपी व अनेक व्यवहारात वापरली जाणारी एक बाब आहे. हा एक एखाद्या वस्तूच्या खरेदी किंवा विक्रीचा (ठरावीक परिमाणाच्या) भविष्यातील निश्चित दिवशी ठरावीक किंमतीला पुरा करण्याची हमी देणारा करार असतो. ज्यावेळी हा करार केला जातो तेव्हा त्या वस्तूच्या किंमतीच्या बदल्यात प्रत्यक्षात रोख रक्कम दिली अथवा घेतली जात नाही. उदाहरण – १ राम याला एक रु.१००००/- किंमतीचा फ्रिज घ्यावयाचा आहे परंतु त्याच्याकडे आज तेवढी रक्कम रोखीत उपलब्ध नाही. त्याला तो अजून ३ महिन्यानी खरेदी करणे शक्य होणार आहे. त्याला अशी भीती वाटते आहे कि अजून ३ महिन्यानी त्या फ्रिजची किंमत वाढली तर आपले नुकसान होईल म्हणून तो काय करतो कि फ्रिज विक्रेत्याशी तो एक करार करतो कि अजून ३ महिन्याने तो हाच फ्रिज आज असणा-या रु.१००००/- या किंमतीलाच विकत घेईल. म्हणजेच त्याने काय केले कि आजच्या चालू किंमतीनेच तो फ्रिज बुक केला. वायदा पुर्तीच्या दिवशी व्यवहार पुर्ण केला जाईल म्हणजे तिन महिन्याने विक्रेता त्याला फ्रिजची डिलेव्हरी देईल व राम त्याला त्यापोटी तेव्हा रु.१००००/- देईल. हा व्यवहार पक्का होण्यासाठी राम विक्रेत्याला काही किरकोळ रक्कम (जी जवळपास व्याजाइतकी असेल) उदा. रु.२५०/- आज प्रिमीअम म्हणून देईल व विक्रेता तो फ्रिज ३ महिने बाजूला ठेवून देईल, तीन महिन्यानी फ्रिजची किंमत जरी १०% वाढली अथवा घटली तरी हा व्यवहार करणे दोघांवर बंधनकारक असेल. यात जर का फ्रिजची किंमत तीन महिन्यानी कमी झाली तर रामचे नुकसान होईल, जर किंमत वाढली तर त्याचा फायदा होईल व जर किंमत तेवढीच राहिली तर त्याला नफा/नुकसान काही होणार नाही. विक्रेत्याला व्याज मिळालेले असल्यामुळे त्याला काहीच फरक पडत नाही. मात्र जर किंमत कमी झाली व रामने व्यवहार पुरा करण्यास नकार दिला तर मात्र विक्रेत्याला नुकसान होईल कारण त्याला फक्त व्याजाचीच रक्कम मिळालेली आहे. म्हणूनच विक्रेता असा करार करताना प्रचलीत व्याज दरापेक्षा थोडा अधिक आकार अथवा प्रिमीअम (व्याज) घेत असतो. जर बाजारात व्याजाचा दर द.म.द.शे. १% असेल तर अशा व्यवहारसाठी तो २% सुध्दा घेतला जाऊ शकतो, अर्थात हा दर बाजारातील किंमतीच्या बदलातील दरावर अवलंबून असतो. उदाहरण २ रे शंकर हा आयातीचा व्यवसाय करणारा व्यावसाईक आहे ज्याला करारानुसार त्याने ऑर्डर केलेल्या मालाचे (जो माल त्याला जवळपास ६/७ महिन्यानी मिळणार आहे) पैसे सहा महिन्यानी अदा करावयाचे आहेत. आता हे पैसे अमेरिकन डॉलरमध्ये द्यावयाचे असल्यामुळे व नेहमीच डॉलर रुपयाच्या किंमतीत रोजच्या रोजच बदल होत असल्यामुळे शंकर त्याच्या बँकेबरोबर एका ठरावीक दराने सहा महिन्यानंतर डॉलर खरेदी करण्याचा करार करतो. याही व्यवहारात बँक चालू दरापेक्षा अधिक प्रिमीअम घेऊनच करार करत असते, असा व्यवहार हा भविष्यातील एका ठरावीक तारखेला पुरा करण्याचा करार करतो म्हणूनच अशा कराराला फॉरवर्ड कॉन्ट्रँक्ट असे म्हटले जाते. आता तुमच्या मनात प्रश्न पडेल कि शेअर/सिक्युरिटी व डेरिव्हेटिव्हजमध्ये फरक काय आहे, तर शेअर/सिक्युरिटी हि एक प्रकारची मालमत्ता (असेट) आहे व डेरिव्हेटिव्हज हा एक करार असतो.

लेखक – सदानंद

इंडेक्स फ्युचर्स

इंडेक्स म्हणजे काय?

इंडेक्स फ्युचर्स समजून घेण्यासाठी प्रथमत: इंडेक्स म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. स्टॉक इंडेक्स म्हणजे एखाद्या शेअर्सच्या समुहातील शेअर्सच्या किंमतीमधील बदलाची नोंद घेणारी यंत्रणा. याच्यामुळे शेअर बाजाराची तेजी अथवा मंदिची दिशा समजण्यासाठी मदत होते. जेव्हा एखाद्या स्टॉक इंडेक्समधील अधीकांश शेअर्सच्या किंमतीत वाढ होते तेव्हा त्या इंडेक्समध्ये वाढ होते किंवा जेव्हा बहुतांशी शेअर्सच्या किंमतीत घट होते तेव्हा त्या इंडेक्समध्येसुध्दा घट होते. उदा. जेव्हा बहुतांशी बँकांच्या शेअर्सची किंमत कमी होते तेव्हा बँकेक्स (बँकासाठी असणारा इंडेक्स) मध्ये घट झाल्याचे दिसते.

सेन्सेक्स व निफ्टी

भारतीय शेअर बाजारात सर्वात जास्त लोकप्रिय असणारे दोन इंडेक्स म्हणजे १) बीएसई सेन्सेक्स, देशातील ३० प्रमुख कंपन्यांचे, त्यांच्या बाजारमुल्यावर आधारीत, शेअर्स या इंडेक्समध्ये समाविष्ठ असतात व या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती जशा कमी अथवा जास्त होतात त्यानुसार या इंडेक्समध्येसुध्दा चढ उतात होत असतात. २) एस अॅण्ड पी निफ्टी देशातील ५० प्रमुख कंपन्यांचे, त्यांच्या बाजारमुल्यावर आधारीत, शेअर्स या इंडेक्समध्ये समाविष्ठ असतात व या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती जशा कमी अथवा जास्त होतात त्यानुसार या इंडेक्समध्येसुध्दा चढ उतात होत असतात. या दोन्ही इंडेक्समध्ये एकूण १४ क्षेत्रीय (सेक्टोरल) गृप आहेत. यानंतर बीएसई नॅशनल इंडेक्स व बीएसई २०० असेही इंडेक्स आहेत. बीएसई सेन्सेक्स हा देशातील पहिला स्टॉक इंडेक्स आहे. निफ्टीची स्थापना एप्रिल १९९६ मध्ये झालेली असून तो नोव्हे. १९९५ च्या किंमतीवर आधारीत सुरु झाला. निफ्टी इंडेक्समध्ये ५० कंपन्यांचे शेअर्स असून त्यातील प्रत्येकाचे भांडवली मुल्य हे किमान रु.५०० कोटी एवढे ठरवण्यात आलेले आहे.

फ्युचर्स व स्टॉक इंडेक्स

स्टॉक इंडेक्स फ्युचर्स समजण्यासाठी कोणकोणते इंडेक्समध्ये सौदे करता येतात व त्या इंडेक्समध्ये कोणते शेअर्स समाविष्ठ असतात हे समजून घेणे अत्यावश्यक असते. वायदे बाजारात सौद्याचा करार (कॉन्टॅक्ट) करण्यासाठी योग्य तो इंडेक्स निवडणे आवश्यक असते. सौदे एक तर स्पेक्युलेशनमुळे तरी केले जातात अथवा हेजींगसाठी तरी केले जातात. स्पेक्युलेशनशसाठी त्या इंडेक्समध्ये कितीप्रमाणात अस्थीरता आहे हे विचारात घेतले जाते तर हेजींगसाठी इंडेक्सची निवड हि ज्या शेअरसंबधी हेजींग करावयाचे असते तो शेअर व त्या शेअर संबधीत इंडेक्सबाबत याची तुलना करावी लागते. वायदे बाजारातील चढ उतार हे नियमीत इंडेक्समधील चढ उतारापेक्षा जास्त असतात हे लक्षात ठेवले पाहिजे व अशा प्रकारचे सौदे करताना जास्त काळजी घेतली पाहिजे. जर का तुम्ही बँकींग कंपन्याचे शेअर्स खरेदी केलेले असतील तर त्याच वेळी बँकेक्स इंडेक्समध्ये हेजींगसाठी वायदे बाजारातील सौदे पुरक ठरु शकतात. ज्या ज्या वेळी तुम्ही एखादा शेअर खरेदी करता त्या त्या वेळी तुम्ही खरे पहाता त्या संबंधीत निफ्टी अथवा सेन्सेक्स संबधी जोखीम स्विकारलेलीच असते कारण बहुतांशी वेळा जेव्हा सेन्सेक्स मध्ये वाढ होते तेव्हा संबंधीत शेअरच्या किंमतीतही वाढ होते व जेव्हा सेन्सेक्समध्ये घट होते तेव्हा संबंधीत शेअरच्या किंमतीत घट होत असते. सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठीसुध्दा इंडेक्स फ्युचर्समधील सौद्यांवर लक्ष ठेवणे हे त्याच्या पोर्टफोलीओतील शेअर्सबाबत निर्णय घेण्यासाठी व हेजींगसाठीसुध्दा उपयुक्त होते. इंडेक्स फ्युचर्स आपण मागील प्रकरणात पाहिलेच आहे कि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दोन व्यक्ती/संस्थामधील भविष्यात ठरावीक काळानंतर एका ठरावीक किंमतीला एखाद्या मालमत्तेची खरेदी अथवा विक्री करण्यासंबधातील एक करार असतो. त्याचप्रमाणे इंडेक्स फ्युचर्सचे सौदे करतानाही संबंधीत (निफ्टी अथवा सेन्सेक्स) स्टॉक इंडेक्सच्या भविष्य काळातील ठरावीक दिवशी पुरे करण्याच्या उद्देशाने फ्युचर कॉन्टॅक्ट केले जाते. जर का एखाद्याला वाटत असेल कि पुढील ३ महिन्यात बाजारात तेजी येईल तर तो ३ महिने मुदतीचा (निफ्टी अथवा सेन्सेक्स) स्टॉक इंडेक्स खरेदी करेल व वायदा पुर्तीच्या दिवशी तो असणा-या किंमतीनुसार व्यवहार पुर्ण करुन त्यातून त्याला नफा अथवा नुकसान होईल. याबाबत आपण पुढील प्रकरणातून जास्त माहिती मिळवणार आहोत. भारतात इंडेक्स फ्युचर्सचे करार हे निफ्टी व बीएसई सेन्सेक्सशी संबंधीत असतात व त्याची मुदत हि एक महिना, तिन महिने यापैकी आपणाला निवडता येते. प्रत्येक करार हा महिन्यातील शेवटच्या गुरुवारी संपणारा असतो व त्याच वेळी नवीन करार बाजारात उपलब्ध केला जात असतो. निफ्टीमध्ये एक लॉट हा 75 किंवा त्याच्या पटीतर खरेदी/विक्री करावा लागतो. म्हणजेच जर का तुम्ही निफ्टीचे एक कॉन्ट्रॅक्ट खरेदी केले तर त्या व्यवहाची एकूण किंमत 75 X 11600 (निफ्टीची किंमत) = 87,0,000 एवढी होईल. यापुढील प्रकरणात आपण इंडेक्सच्या प्रायझींग बाबत समजून घेऊया.

लेखक – सदानंद

हेजींग

हेजींगचा वापर रोखीच्या बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी कसा करावा?

जर का तुम्ही शेअर बाजारात रोखीच्या बाजारात व्यवहार करत असाल तर त्यामध्ये असणारी जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारातील स्टॉक इंडेक्स फ्युचर्सचे माध्यमातून रोखीच्या बाजारातील जोखीम कशा प्रकारे कमी करता येते हे तुम्ही समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर काय होते कि तुम्ही रोखीच्या बाजारात खरेदी केलेल्या शेअर्सचा भाव काही काळाने वाढल्यामुळे तुम्हाला फायदा होतो मात्र याचवेळी जर परत बाजारात मंदी आली व भाव कमी झाले तर झालेल्या फायद्यात नुकसान होते व नंतर पस्तावण्याची वेळ येते. यासाठीच बाजारात प्रवेश करतानाच वायदे बाजाराची माहिती करुन घेणे अत्यावश्यक असते. स्टॉक इंडेक्स फ्युचर्सचे माध्यमातून गुंतवणूकदाराना, पोर्टफोलीओ मॅनेजर, म्युच्युअल फंड इ. ना अनेक प्रकारे जोखीमीचे व्यवस्थापन करणे शक्य होते. व्हरायन्स किंवा स्टॅण्डर्ड डेव्हीएशनच्या आधारे जोखीमीचे मोजमाप करता येते. शेअर बाजारातील जोखीम शेअर्सच्या बेटाव्दारे सर्वसामान्यपणे मोजली जाते. हा बेटा www.nseindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध असतो. हेजींग करताना किती कॉन्ट्रॅक्ट केली असता जोखीम कमीत कमी केली जाऊ शकते हे ठरवणे अत्यावश्यक असते. तुम्हाला असे वाटते का हि एखाद्या शेअरची किंमत हि त्याच्या ख-या मुल्यापेक्षा कमी आहे? नफा मिळवण्यासाठी हा प्रश्न विचारणे अत्यंत गरजेचे असते. तसेच कोणताही शेअर खरेदी करताना, त्या शेअरच्या बाजारातील किंमती पेक्षा त्याची व्हॅल्यू जास्त आहे असे तुम्हाला वाटले तरच तुम्ही तो शेअर खरेदी केला पाहिजे. ज्या व्यक्तीला असे वाटते ती व्यक्ती तो शेअर रोखीच्या बाजारात दिर्घ काळासाठी खरेदी करतो. मात्र असे करताना दोन प्रकारच्या जोखीम तो स्विकारत असतो. (१) त्याची समज चुकीची असू शकते, संबंधीत कंपनीच्या कामगीरीची पडताळणी करता असे समजते कि खरे पहाता त्या शेअरची किंमत बाजारभावापेक्षा जास्त नसते म्हणून नुकसान होण्याचा संभव असतो. (२) जरी त्याची समज बरोबर असली तरीसुध्दा जर एकूणच बाजारात मंदीचे वातावरण असेल तरीसुध्दा त्या शेअरची किंमत कमी होऊन नुकसान होऊ शकते. आता अशाप्रकारे असणारी जोखीम इंडेक्स फ्युचरमध्ये हेजींग करुन कमी कशी करता येईल हे उदाहरणाने पाहुया: राजेश कडे एबीसी कंपनीचे रु.९ लाख बाजारमुल्याचे शेअर्स असून दि. १ जुलै २०१२ रोजी त्या शेअरचा भाव रु.२९० हा आहे. आता असे समजूया कि त्या कंपनीचा बेटा १.१३ आहे. त्या दिवशी जर निफ्टी फ्युचर हा ५२२५ असेल तर आता हे पाहिले पाहिजे कि निफ्टी फ्युचरची किती कॉन्ट्रॅक्ट राजेशने विकली पाहिजेत. हेजींग करण्यासाठी त्याला ९ लाख X १.१३ = १०१७००० रुपयांच्या एवढ्या किंमतीची कॉन्ट्रॅक्टस निफ्टीवर विकली तर त्याची जोखीम कमी करता येईल म्हणजेच त्याला एकून १९५ कॉन्ट्रॅक्टस (१०१७००० / ५२२५) विकण्यासाठी वायदे बाजारात ठेवावी लागतील. दि. १९ जुलै २०१२ रोजी निफ्टी फ्युचर ४९३० असून एबीसी कंपनीच्या शेअरचा भाव रु.२७५ आहे. या दिवशी राजेशने त्या दिवशी रोखीच्या बाजारातील व वायदे बाजारातील आपली गुंतवणूक काढून घ्यावयाचे ठरवले तर काय होईल ते पाहुया. १) रोखीच्या बाजारातील दि.१/७/१२ चे एबीसी कंपनीच्या शेअरचे मुल्य रु.९ लाख. वजा: दि.१९/७/१२ रोजी एबीसीच्या शेअर्सचे मुल्य रु.८५३४४८ = रु.४६५५२ नुकसान. २) वायदे बाजारात राजेशने दि.१/७/१२ रोजी निफ्टी रु.५२२५ भावाने विकला होता व दि.१९/७/१२ रोजी निफ्टी आहे रु.४९३० म्हणजेच येथे त्याला प्रती कॉन्ट्रॅक्ट (५२२५ – ४९३०) रु.२९५ या प्रमाणे एकूण फायदा झाला (२९५ X १९५) रु.५६०५०/३) म्हणून त्याला रोखीचा बाजार व वायदे बाजारातून मिळूण निव्वळ फायदा झाला रु.९४९८ (५६०५० – ४६५५२) आता एक दुसरे उदाहरण पाहुया: असे समजा कि तुमच्या पोर्टफोलीओमधील सर्व शेअर्सचे मिळून बाजार मुल्य रु.१० कोटी आहे, तुम्हाला चांगला फायदाही झालेला आहे, यावेळी तुमच्या पोर्टफोलीओचा बेटा १.१९ आहे. याचवेळी निफ्टी फ्युचर ४५०० वर ट्रेड करत आहे. तुम्हाला असे वाटते आहे कि सध्याची सरकारी धोरणे बाजाराला अनुकुल नसून प्रतिकुल आहेत तसेच जागतीग बाजारातील परिस्थितीसुध्दा निराशादायक आहे म्हणून आता तुमची इच्छा आहे कि या क्षणी आपला पोर्टफोलीओ पुर्णता सुरक्षीत करावा, तर वायदे बाजाराचा वापर करुन आपण हे कसे साध्य करु शकतो त्यासाठी खालील प्रमाणे करावे लागेल. निफ्टी ४५०० X २०० (मार्केट लॉट) = रु.९ लाख हि झाली एका लॉटची किंमत. म्हणून तुम्हाला आता किती निफ्टीची कॉन्ट्रॅक्ट विकली पाहिजेत? ज्यामुळे तुमचा पोर्टफोलीओ पुर्णत: सुरक्षीत होईल व जरी बाजार खाली गेला तरी तुमच्या पोर्टफोलीचे मुल्य कमी होणार नाही. बेटा १.१९ X १० कोटी = ११.९० कोटी या रकमेची कॉन्ट्रॅक्ट जर का तुम्ही वायदे बाजारात विकली तर तुम्ही तुमचा पोर्टफोलीओ सुरक्षीत करु शकता. आता या साठी किती कॉन्ट्रॅक्ट विकली पाहिजेत? निफ्टीच्या एका लॉटची किंमत आहे रु.९ लाख म्हणून ११.९० / ९ = १३२ निफ्टीचे लॉट तुम्हाला वायदे बाजारात विकावे लागतील. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे कि या व्यवहारात जर का तुम्ही १३२ पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट विकलीत तर तुम्ही जास्त हेजींग केलेत असे होईल व जर का तुम्ही १३२ पेक्षा कमी कॉन्ट्रॅक्ट विकलीत तर तुम्ही हेजींग कमी केलेत असे होईल. म्हणून यासाठीच तारतम्य पाळावे लागतेच तर किती कॉन्ट्रॅक्टचा व्यवहार केला पाहिजे हे अगोदरच निश्चित केले पाहिजे, त्यासाठी प्रथम हे ठरवले पाहिजे कि आपण किती जोखीम स्विकारु शकतो म्हणजेच किती फायद्यासाठी किती नुकसान झाले तर मला चालू शकेल हे आधी ठरवा व त्यासाठी रोखीच्या बाजाराचा व वायदे बाजाराचाही एकत्रीतपणे वापर करता आला पाहिजे. वरील उदाहरणावरून या व्यवहारासाठीची सुत्रे तुमच्या लक्षात आली असतीलच, ती परत खाली देत आहे. रोखीच्या बाजारातील जोखीमीचे मुल्य = तुमच्याकडील शेअर्सचे बाजार मुल्य X शेअर/शेअर्सचा बेटा आता ज्याप्रमाणात जोखीमीचे मुल्य असेल व तुमची जोखीम स्विकारण्याची जेवढी तयारी असेल याप्रमाणातच वायदे बाजारात निफ्टी किंवा बीएसई सेन्सेक्सची फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही विकावयास ठेवली पाहिजेत. विकावयास ठेवावयाची (निफ्टी/बीएसई) कॉन्ट्रॅक्ट = रोखीच्या बाजारातील जोखीमीचे मुल्य / निफ्टी/बीएसई च्या एका कॉन्ट्रॅक्टची किंमत. यात एक गोष्ट लक्षात ठेवा हि जरी निफ्टी/बीएसई च्या एका कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य जेवढे असते तेवढी रक्कम तुम्हाला वायदे बाजारात गुंतवावी लागत नसून यासाठी तुम्हाला त्यासाठी असणा-या प्रिमीयमची रक्कमच प्रथमत: द्यावी लागते जी बाजारातील परिस्थितीनुसार कमी अथवा जास्त असते, हि रक्कम ठरवण्यासाठी ओपन इंटरेस्ट आदि गोष्टी विचारात घेतल्या जातात या बाबतची माहिती पुढील काही प्रकरणातून मी देणार आहे. वायदे बाजारातील या सुवीधेचा अतिरेकी वापर करु नये अन्यथा तेजीच्या कालखंडात होणारा फायदा गमावून बसावे लागेल. याचा वापर मंदिच्या काळात व जेव्हा बाजारात नियमीतपणे जास्त अस्थिरता असते किंवा जेव्हा बाजार एका प्राईज बँडमध्ये वर खाली होत असतो अशा काळात करणे फायदेशीर होते.

लेखक – सदानंद

स्पेक्युलेशन – अंदाज बांधून व्यवहार करणे

फ्युचर्समध्ये काही व्यक्ती बाजार भविष्यात कोणत्या दिशेने जाईल याचा निव्वळ अंदाज बांधून फ्युचर्सचे सौदे करतात. म्हणजेच जर त्याना असे वाटले कि काही ठरावीक काळात बाजारात तेजी येईल तर ते त्या अंदाजानुसार काही शेअर्स, इंडेक्स अथवा क्षेत्रीय इंडेक्सची खरेदी करण्याचा करार करतात अथवा जर त्यांचा अंदाज असेल कि बाजारात मंदी येईल तर ते विक्रीचा करार करतात. थोडक्यात ते निव्वळ जोखीम स्विकारुन बाजारात उतरतात म्हणजेच याला जुगारीपणा असेही म्हटले जाते. झाला तर भरपूर फायदा नाहीतर नुकसानही सोसण्याची त्यांची तयारी असते. असे व्यवहार करताना ते फक्त बाजारातील मागणी – पुरवठा, बाजाराचा कल, ओपन इंटरेस्ट, अर्थव्यवस्था इ. बाबींचाच विचार करतात. अल्पकाळात जास्त नफा मिळावा हाच एकमेव उद्देश अशा सौद्यामध्ये असतो. सामान्य गुंतवणूकदाराने या पासून दुर रहाणेच चांगले. उदाहरण: विजय हा ट्रेडर असून त्याला शेअर्सचे विश्लेषण करण्यात एकतर रस नसतो किंवा वेळ नसतो म्हणून तो बाजाराचा मागील काळातील कल पाहून एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करण्याऐवजी त्या शेअरमध्ये अथवा एखाद्या इंडेक्समध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतो. 1 मे रोजी समजा निफ्टी 11500 वर ट्रेड करत आहे व त्याला वाटले कि बाजार लवकरच वर जाईल तर तो निफ्टीचा फ्युचर विकत घेतो नंतर खरोखर बाजारात तेजी येऊन निफ्टी १ जुनला 11600 पर्यंत वाढेला आणि त्याने त्या दिवशी त्याची विक्री केली तर: विक्री किंमत 11600 x 75 = रु.8,70,000/वजा: खरेदी किंमत 11500 x 75 = रु.8,62,00/त्याला झालेला निव्वळ फायदा रु.7500 पण याच काळात जर निफ्टी खाली आला असता तर त्याला त्याप्रमाणात नुकसानही सोसावे लागले असते. तसेच त्याचा अंदाज बाजार खाली येणार असा असता तर त्याने अगोदर निफ्टी विकला असता व खाली आल्यावर खरेदी करुन फायदा मिळवला असता. असे व्यवहार करताना ३ महिन्यापर्यतचे करार खरेदी/विक्री करता येतात, त्यानंतर ते हवे तर नवीनीकरणही करता येतात.

लेखक – सदानंद

आर्बीटेज

आर्बीटेजर म्हणजे अशा व्यक्ती ज्या अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पोसिशन घेतात कि ज्यामुळे कोणतीही जोखीम न स्विकारता फायदा मिळवता येतो. जेव्हा बाजारात अनियमीतता असते अशा वेळी हे एका मार्केटमधून खरेदी करतात व दुस-या मार्केटमध्ये त्याचवेळी विक्री करतात. म्हणून आर्बीटेजर बाजारातील अशा संधीची नेहमीच वाट पहात असतात. फ्युचर्समध्ये (वायदे बाजारात) कमी किंमतीत स्टॉक/शेअर्स किंवा इंडेक्स विकत घेऊन भविष्यातील जास्त किमतीला विकून तुम्ही आर्बीटेज संधीचा फायदा उठवू शकता. यासाठी इंडेक्सची स्पॉट प्राइज व फ्युचर प्राईजमध्ये व्याजापेक्षा जास्त फरक असताना हा फायदा मिळवता येतो. आता हि गोष्ट समजण्यासाठी एक उदाहरण पाहुया. · समजा आत्ता निफ्टी 11300 आहे व ३ महिन्यानंतरच्या निफ्टी फ्युचरची प्राईज 11550 आहे. · निफ्टीची भविष्यातील (फ्युचर) किंमत (प्राईज) हि ३ महिन्याचे व्याज विचारात घेऊन काढता येते. · आता फ्युचर प्राईज हि व्याजापेक्षाही जास्त असल्यास येथे आर्बीटेज संधी निर्माण होते. हि गोष्ट जास्त सुलभपणे समजण्यासाठी आता आपण एखाद्या शेअरबाबत हे उदाहरण पाहुया. समजा स्पॉट मार्केटमध्ये अॅक्सीस बँकेच्या एका शेअरची किंमत रु.१००० आहे व ३ महिन्यानंतर संपणा-या अॅक्सीस बँकेचा फ्युचर रु.१०७० आहे. आता जर का एखाद्याने १२% वार्षीक व्याज दराने रु.१००० तीन महिन्यासाठी घेऊन अॅक्सीस बँकेचा एक शेअर स्पॉट मार्केटमध्ये खरेदी केला व त्याच वेळी ३ महिन्याचा फ्युचर रु.१०७० ला विकला तर काय होते ते पहा: · विक्री किंमत रु.१०७० · वजा- व्याजासह खरेदी किंमत (१००० + ३०) रु.१०३० · आर्बीटेज फायदा रु.४०/
बाजारात अशा संधी अनेकवेळा उपलब्ध होत असतात यासाठी तुम्ही अलर्ट असणे मात्र गरजेचे असते कारण या संधी लगेचच हुषार लोकं उचलत असतात. याचप्रमाणे ऑपशन्समध्ये दर महिन्याला जेव्हा एक महिन्यानंतर संपणा-या कॉन्ट्रॅक्टमध्ये बाजाराचा सुरुवातीचा कल पाहून लांबचा (लॉंग) पुट किंवा कॉल शॉर्ट करुन नंतर २ ते ३ दिवसानी परत बाजाराचा कल पाहून विरुध्द बाजूचा पुट किंवा कॉल शॉर्ट केला असता दर महा साधारणपणे आपल्या गुंतवणूकीवर रिस्क फ्रि २ ते ३% फायदा नियमीतपणे मिळवता येतो. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल एका ठरावीक (टक्केवारीच्या) रेंजमध्येच मार्केट प्रत्येक महिन्यात वर किंवा खाली जात असते. यासाठी मार्केट पुढील एक महिन्यात किती पॉईंट खाली अथवा वर जाऊ शकेल हे विचारात घेतले जाते, दुरच्या ऑपशनमध्ये जोखीम जवळपास नसतेच याची माहिती मी ऑपशन विभागातील लेखात देणार आहे. हि पध्दत मी गेले ३ वर्षे वापरत असून फक्त एकदा मार्केट मी ठरवलेल्या रेंजच्या बाहेर गेले होते तेव्हा एका बाजूला फायदा व दुस-या बाजूला नुकसान झाले होते, जे अत्यंत किरकोळ होते. डिसक्लेमर: वरील उदाहरणे तुम्ही या बाबत पुर्ण अभ्यास करुनच तुमच्यासाठी वापरावीत, पुरेसा अभ्यास केल्या शिवाय हे केले असता नुकसान होऊ शकते. कारण रेंज ठरवणे, प्रिमीयम विचारात घेणे या गोष्टी महत्वाच्या असतात. पुरेशा भांडवलाचीसुध्दा गरज असते. तसेच या प्रकारात एखाद्या वर्षी जर का बाजार १००% जरी वर गेला तरी तुमचा होणारा फायदा हा वार्षीक २४ ते ३०% एवढाच होतो. जर का तुम्ही फिअर (भीती) व ग्रीड (हाव/लोभ) याना दुर ठेवू शकलात तरच शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात.

लेखक – सदानंद

इंडेक्स फ्युचर्स प्रायझींग

इंडेक्स फ्युचर्सचा वापर विविध प्रकारे करता येत असल्यामुळे हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. जर का तुम्हाला आर्बिटेजचा वापर करुन नफा मिळवावयाचा असेल तर तुम्हाल कॉस्ट ऑफ कॅरी बाबत माहिती असायलाच हवी.

कॉस्ट ऑफ कॅरी

कॉस्ट ऑफ कॅरी मध्ये कॉन्ट्रक्टची किंमत खालील सुत्राने काढली जाते. एफ = एस + सी एफ = फ्युचर प्राईज एस = स्पॉट प्राईज सी = होल्डींग कॉस्ट किंवा कॅरी कॉस्ट जर एफ हा एस + सी पेक्षा कमी किंवा जास्त असेल तर आर्बिट्रेजची संधी बाजारात उपलब्ध असते. उदा. जर का अॅक्सीस बँकेच्या शेअरची स्पॉट प्राइज रु.१००० असेल व तीन महिन्यानंतरच्या फ्युचरमध्ये त्याची किंमत रु.१०७० असेल तर तुम्ही तो शेअर रु.१००० ला खरेदी करा व त्याच वेळी १२% वार्षीक व्याजाने ३ महिन्यानंतरच्या फ्युचरमधील १०७० च्या कॉन्टॅक्टची विक्री करा तुम्हाला आर्बीटेज नफा रु.४० होईल. कारण येथे एफ = १००० + ३० = १०३० हि किंमत फ्युचरच्या कोटेड १०७० या किंमतीपेक्षा ४० ने कमी आहे. मात्र एक लक्षात ठेवा कि वेगवेगळ्या असेटची होल्डींग कॉस्ट वेगवेगळी असू शकते. डिव्हीडंड यील्ड बाबत फ्युचर प्राईजींग वर आपण कॉस्ट ऑफ फायनान्सचा विचार करुन इंडेक्स फ्युचरची व्हॅल्यु कशी काढावे ते पाहिले. त्याचबरोबर कॉस्ट ऑफ फायनान्स काढताना डिव्हिडंड व व्याजाचाही विचार केला पाहिजे. हेच जर का एखाद्या शेअरच्या फ्युचर बाबत काढावयाचे असेल तर कॉस्ट ऑफ फायनान्स वजा डिव्हिडंड परतावा गृहित धरला पाहिजे. उदा.: तुमच्या स्टॉक पोर्टफोलीओची व्हॅल्यु (पी) रु.१०० आहे ज्यावर तुम्हाला ३% दराने डिव्हिडंड मिळत आहे व फायनान्सचा दर १०% वार्षीक आहे तर एक वर्षानंतर स्टॉक इंडेक्स पोर्टफोलीओची व्हॅल्यु असेल रु.१०७ कशी ते पहा एफ = १०० + १०० गुणीले (०.१० – ०.३०) = १०७ आता जर का प्रत्यक्षात एक वर्षानंतरच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्ट रु.१०९ असेल तर येथे तुम्हाला रु.२ चा निव्वळ नफा मिळवता येईल. ( एफ १०९ + डिव्हिडंड ३ – पी १०० – व्याज १० = आर्बीटेज फायदा २). या प्रकारे डिव्हिडंडचा विचार करुन योग्य व्हॅल्यू काढता येते.

लेखक – सदानंद

GET IN TOUCH WITH US !

X
CONTACT US